

किनवट : किनवट तालुक्यातील बोधडी येथील रहिवासी मारोती रामा बोईनवाड (वय ३३) यांचा धावत्या रेल्वेतून पडून झालेल्या गंभीर अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे बोईनवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
२५ जानेवारी रोजी रात्री सुमारे १०.१० वाजता मारोती बोईनवाड हे किनवट ते तिरुपती कृष्णा एक्सप्रेसने प्रवास करत होते. दरम्यान बोधडी रेल्वे स्थानकाच्या परिसरात ते धावत्या गाडीतून अचानक खाली पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील सर जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच आज गुरूवारी (दि. २९) त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी नोंद घेतली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बोधडी परिसरात शोककळा पसरली आहे.