

उमरखेड (नांदेड) : स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका नगरपरिषद व जिल्हा परिषद पंचायत समिती हया निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांचे उमेदवार रणांगणात उतरणार आहेत. मात्र विधानसभा क्षेत्राचे सत्ताकेंद्रच मागील तीन टर्मपासून भाजपकडे असल्याने, नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षाकडून आपला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा भाजपच्या निष्ठावंताना आहे, मात्र नव्याने पक्षात प्रवेश केलेल्यांचीच जास्त दखल घेतली जात असल्याने उमेदवारीसाठी आमचा विचार होणार का? असा प्रश्न भाजप निष्ठावंतांकडून विचारल्या जात आहे.
नेत्यांना भाजपची विधानसभा, सहकार क्षेत्रात एकहाती सत्ता आहे व नगर परिषद मध्ये होती. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेसाठी उमरखेड भाजपचे नेते मंडळी सुक्ष्म निरीक्षण करित आहेत. नगरपरिषदमध्ये कोणत्या वार्डात, कोणता उमेदवार द्यावा व जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी योग्य उमेदवार कोण राहील, याची चाचपणी सुरु असून इलेक्टिव्ह मेरीट म्हणून उमेदवाराची आर्थिक सक्षमताही तपासली जात आहे.
भाजपमध्ये निष्ठावंत जुने कार्यकर्ते कुठल्याही अपेक्षेविना पक्षाचा झेंडा घेऊन अनेक वर्षापासून काम करित आहे. पण भाजपमधील आता सत्तेचा लाभमिळविण्यासाठी नवीन कार्यकर्त्यांची इनकमिंग वाढली, त्यांचीच दखल नेत्यांकडून घेतली जात आहे. उमेदवारीसाठी निष्ठावंतांचा विचार होताना दिसून येत नाही. मात्र नेत्यांना विसर पडत चालला आहे की, भाजप जवळ आज जी सत्ता आहे, ती निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मिळवून दिलेली आहे.
शहरात तर वार्डा-वार्डातील निष्ठावंत कार्यकत्यांनी निष्ठेने काम केले तेव्हा नगर परिषदेत यापूर्वी भाजपची सत्ता आली होती, हे विसरून चालणार नाही. सहकार क्षेत्रात तिनही संस्था काबीज करण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बळ दिले.
नवे-जुने असा वाद उफाळण्याची शक्यता
आता होवू घातलेली नगरपरिषद व जिल्हा परिषद ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. पण पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार उमेदवारीसाठी होताना दिसून येत नाही, अशी ओरड जुन्याजाणत्या अडगळीत टाकलेल्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. सत्तेची मलाई खात्यासाठी भाजपात सामिल झालेल्यांनाच निवडणुकीमध्ये संधी दिली गेली तर भाजपमध्ये नवे - जुने असा वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.