

उमरखेड : तब्बल ३० वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या घरफोडी व जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला उमरखेड पोलिसांच्या डी.बी. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अखेर जेरबंद केले. विशेष म्हणजे, आरोपीविरुद्ध न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट काढून त्यास फरार घोषित केले असतानाही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. या कारवाईमुळे उमरखेड पोलिसांच्या शोध मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सन १९९५ मध्ये उमरखेड शहरातील एका घरात पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी घरात प्रवेश करून घरमालक व कुटुंबीयांना मारहाण करीत घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ३ हजार ४६५ रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला होता. या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर या गंभीर गुन्ह्यातील आरोपींपैकी एक आरोपी तब्बल तीन दशके पोलिसांना चकवा देत फरार होता.
दरम्यान, न्यायालयानेही आरोपीविरुद्ध स्टँडिंग वॉरंट जारी केले होते. तसेच कायद्यातील तरतुदीनुसार त्यास फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्याची विशेष मोहीम सुरू असून, या मोहिमेअंतर्गत उमरखेड पोलिस ठाण्याचे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने फरार आरोपींचा शोध सुरू केला होता. याच दरम्यान गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीबाबत डी.बी. पथकाला गोपनीय माहिती मिळाली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने हालचाली करीत सापळा रचला. त्यामध्ये परेश रामा काळे, रा. कोळी, ता. हदगाव, जि. नांदेड यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याचा सन १९९५ मधील उमरखेड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी व जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तब्बल ३० वर्षे फरार राहिलेल्या या आरोपीला अखेर पोलिसांनी जेरबंद केल्याने जुन्या प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार शंकर पांचाळ, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहाय्यक फौजदार विजय पाटील यांच्यासह डी.बी. पथकातील प्रशांत भवरे, अतुल तागडे, दिगंबर गिते, संभाजी टेंबर, विष्णू राठोड, निवृत्ती महालकर व चालक आकाश पवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. ३० वर्षांनंतर आरोपी जाळ्यात अडकल्याने उमरखेड पोलिसांच्या डी.बी. पथकाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.