

उमरी : उमरी तालुक्यातील एका महिलेसोबत अश्लील हावभाव केल्याप्रकरणी उमरी न्यायालयाने आरोपीस एक वर्षाचा साधा कारावास व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
सरकारी वकील निखिल मनोहर मगदूम यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी फिर्यादी महिला शेतात गेली असता आरोपी तेथे आला. त्याने महिलेपुढे येऊन अश्लील कृत्य करत गुप्तांग दाखवले तसेच तिला धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने तत्काळ घरी धाव घेतली.
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून उमरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०९ अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बी. एस. वडजे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
अभियोग पक्षातर्फे एकूण चार साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. साक्षीदारांचे जबाब व पुरावे ग्राह्य धरून उमरी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी श्री. के. एस. कुलकर्णी यांनी आरोपी साईनाथ सायन्ना आडपोड (रा. बोथी, ता. उमरी, जि. नांदेड) यास एक वर्षाचा साधा कारावास व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात अभियोग पक्षाची बाजू सरकारी वकील निखिल मनोहर मगदूम यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांना पोलीस जमादार बी. जी. बोडके यांनी सहकार्य केले.