

नायगाव : तालुक्यातील वनक्षेत्रात उन्हाळ्याच्या कडक झळा वाढू लागल्याने हरिण, काळवीट, वानर, ससे यांसारख्या वन्य प्राण्यांच्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न गंभीर बनतो. या पार्श्वभूमीवर वन विभागाने पुढाकार घेत मौजे घुंगराळा, तळबीड व कुंचेली (ता. नायगाव) परिसरात वन्यजीवांसाठी सिमेंटचे पाणवठे उभारून त्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. वन विभागाच्या या उपक्रमामुळे वनक्षेत्रातील प्राण्यांना उन्हाळ्यातही पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होत असून, हा उपक्रम वन्यजीव संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.
या कामासाठी नांदेड जिल्ह्याच्या उपवनसंरक्षक मा. सौ. मनीषा पाटील तसेच सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व कँपा) श्री भारत खेळबांडे यांचे मार्गदर्शन लाभले. देगलूर वन परिक्षेत्र अधिकारी श्री रामराव देवकते यांच्या सूचनेनुसार वनपाल संतवाले, वनरक्षक गजानन कोतलवार आणि स्थानिक वनमजूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे काम पूर्ण करण्यात आले. वन परिक्षेत्रात एकूण ५ सिमेंट पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली असून, त्यामध्ये नियमितपणे टँकरद्वारे पाणी सोडले जात आहे. परिणामी, वन्य प्राणी सुरक्षितपणे पाण्याची तहान भागवू शकत आहेत.
वन विभागाच्या या उपक्रमामुळे केवळ प्राण्यांचे प्राण वाचण्यास मदत होत नाही, तर मानवी वस्तीच्या दिशेने होणारी त्यांची भटकंतीही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत वन विभागाचे कौतुक केले आहे. उन्हाळ्याच्या तडाख्यात वन्यजीवांसाठी ‘जीवनदायी पाणवठे’ ठरत असून, संवर्धनाच्या दिशेने हा एक आदर्श उपक्रम ठरतो आहे.