Nanded News | गतवर्षीपेक्षा ३५ लाख मेट्रिक टन ऊस कमी
नवीन नांदेड : येत्या हंगामात ऊस गाळपासाठी प्रस्ताव स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव दाखल करता येणार आहेत. दरम्यान, आजपर्यंत पाच कारखान्यांनी प्रस्ताव सादर केले असून गाळप केव्हापासून सुरू करायचे याबाबत मात्र अद्याप स्पष्टता आलेली नाही. यंदा गतवर्षपिक्षा सुमारे ३५ लाख मेट्रिक टन ऊस कमी आहे. त्यामुळे फारतर फेब्रुवारी अखेरपर्यंतच कारखान्यांचे पट्टे पडतील, असा अंदाज आहे.
प्रादेशिक साखर सहसंचालक नांदेड विभागात दरवर्षी उसाचे क्षेत्र घटत चालले आहे. तज्ज्ञांच्या मते दर तीन वर्षांनी उसाचे क्षेत्र वाढते व पुढे कमी कमी होत जाते. परंतु कारखान्यांच्या बेशिस्त कारभारामुळे ऊस लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी होत असून उसाला पर्याय म्हणून नगदी पीकअसलेल्या केळीकडे शेतकरी आकर्षित होऊ लागले आहेत. नांदेड जिल्ह्यात केळी लागवडीकडे कल वाढत चालला आहे. असे असले तरी प्रत्यक्ष नोंदीनुसार नांदेड विभागात केवळ नांदेड जिल्ह्यातच चव्हाण हा एकमेव सहकार उसाचे लागवड क्षेत्र यंदा वाढल्याचे दिसते.
तीन वर्षांपूर्वी धाराशिव जिल्हा वगळल्यानंतर नांदेड विभागात चार जिल्हे शिल्लक आहेत. पैकी नांदेड जिल्ह्यात सहा कारखाने असून पैकी भाऊराव तत्त्वावरील कारखाना उरला आहे. लातूर जिल्ह्यातील ११ कारखान्यांपैकी अद्याप ६ कारखाने सहकारी आहेत. हिंगोलीत पाच (सहकारी २) कारखाने तर परभणी जिल्ह्यात ७ कारखाने आहेत. या सर्व कारखान्यांनी २०२३-२४ च्या हंगामात तब्बल १ कोटी १७ लाख ६६ हजार ५४५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्या माध्यमातून १ कोटी २० लाख ६५ हजार ८७ किंटल साखरेचे उत्पादन झाले. त्याचा सरासरी उतारा १०. २५ टक्के आला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाची उपलब्धता खप कमी आहे. उपर्युक्त चार जिल्ह्यात मिळून साखर कारखान्यांकडे २ लाख १० हजार ९९९ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड असल्याची नोंद आहे. पण कृषी विभागाच्या अंदाजानुसार १ लाख १० हजार हेक्टरवर ऊस असावा. त्यामुळे दोघांनी संयुक्तपणे १ लाख २५ हजार ४८५ हेक्टरवर लागवड असल्याचे निश्चित केले असून या माध्यमातून ८२ लाख ४८ हजार ७६५ मेट्रिक टन उसाचे उत्पादन होईल.
अर्थात प्रत्यक्ष किती ऊस होता आणि किती मेट्रिक टन गाळप झाले हे नंतर कळेल. परंतु गतवर्षी झालेले गाळप लक्षात घेता यंदा ३५ लाख १७ हजार ७८० मेट्रिक टन उसाचे प्रमाण कमी आहे.
यंदाचा गळीत हंगाम मार्चपर्यंत चालेल का !
लातूरमध्ये २५ लाख मेट्रिक टन घट नांदेड विभागातील लातूर जिल्ह्यात गतवर्षी ४९ लक्ष ४० हजार ९२१ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. यंदा केवळ २३ लक्ष ६५ हजार २८५ मेट्रिक टन उसाची लागवड झाली आहे. अर्थात तब्बल २५ लाख ७५ हजार ४३६ मेट्रिक टन ऊस कमी आहे. हिंगोलीत १ लाख ६५ हजार १६२ मेट्रिक टन तर परभणी जिल्ह्यात १२ लाख १६ हजार १०५ मेट्रिक टन ऊस कमी उपलब्ध आहे. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम मार्चपर्यंत तरी चालतो किंवा नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

