

Nanded News: Stay on first-year B.Sc. admissions in 24 colleges affiliated with SRTMU
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करण्याचा पवित्रा घेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने एक मोठा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यापीठ परिक्षेत्रातील तब्बल २४ महाविद्यालयांमधील बी. एस्सी. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला तत्काळ स्थगिती देण्यात आली आहे. आवश्यक प्रयोगशाळा नसणे, पात्र प्राध्यापकांची कमतरता आणि 'ट्रिपल ए' (शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण) नियमांतील त्रुटींमुळे विद्यापीठाने ही कडक कारवाई केली आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक संलग्नीकरण विभागाने केलेल्या तपासणीत ५४ महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. त्यापैकी वेळोवेळी पाठपुरावा करूनही सुधारणा न करणाऱ्या २४ महाविद्यालयांवर ही कुऱ्हाड कोसळली आहे.
यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश आहे. प्रामुख्याने माहूरचे ग्यानबाजी केशवे महाविद्यालय, उस्माननगरचे बसवेश्वर महाविद्यालय, नांदेडचे देविदासराव कल्याणकर महाविद्यालय, हिंगोलीचे राजर्षी शाहू व आदर्श महाविद्यालय, लातूरचे त्रिपुरा, स्वामी विवेकानंद व ब्रिलियंट महिला महाविद्यालय यांसह २४ संस्थांचा यात समावेश आहे.
काही महाविद्यालयांना तपासणीत 'एफ' ग्रेड मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी त्या संस्थेची विद्यापीठ मान्यता, प्रयोगशाळा आणि विद्यापीठाचे अधिकृत परिपत्रक तपासूनच आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
विद्यापीठाचा इशारा आणि आवाहन
"संबंधित महाविद्यालयांनी बी. एस्सी. प्रथम वर्षासाठी कोणतेही प्रवेश करू नयेत. आदेश डावलून प्रवेश दिल्यास विद्यार्थ्यांचे पात्रता अर्ज, परीक्षा किंवा निकालाचे जे नुकसान होईल, त्याला सर्वस्वी महाविद्यालय प्रशासनच जबाबदार असेल," असा इशारा विद्यापीठाने दिला आहे.