

देगलूर: बकरी ईदचा सण तोंडावर असताना देगलूर आगारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुचाकीवर तेलंगणात सासुरवाडीला जाताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत एसटी वाहक एम . ए. नजीर रा. मूळ गाव भोकर हे जागीच ठार झाले. त्यांच्या अपघाती निधनाने देगलूर आगारात हळहळ व्यक्त होत आहे.
नजीर हे दुचाकीवरून तेलंगणातून जात असताना भरधाव वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच देगलूर आगार व्यवस्थापक संजय आकुलवार हे सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी व नजीर यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली.
विशेष म्हणजे वडिलांच्या निधनानंतर त्यांना अनुकंपा तत्वावर एसटी महामंडळात नोकरी मिळाली होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुले व मुलगी असा परिवार आहे. नजीर यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, गुरुवारी मदनूर येथील शासकीय रुग्णालयात सकाळी शवविच्छेदन करण्यात आले असून असून पार्थिव देह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. दिनांक 28 रोजी सायंकाळी 5-00 वाजता त्यांच्या मूळ गावी भोकर येथे दफनविधी करण्यात आले आहे.
गुरुवारी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदच्या पूर्वसंध्येला ही दुर्दैवी घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे. देगलूर आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी एम. ए.नजीर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नजीर अत्यंत मनमिळाऊ व कर्तव्यदक्ष कर्मचारी होते. त्यांच्या जाण्याने आगाराचे मोठे नुकसान झाले आहे. महामंडळ कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.
संजय आकुलवार, आगार व्यवस्थापक, देगलूर.