

उमरखेड : आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाला महावितरणच्या दुर्लक्षामुळे आणखी एक मोठा फटका बसला आहे. उमरखेड शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नागेशवाडी शेतशिवारात २५ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास विद्युत रोहित्रावर (डीपी) झालेल्या शॉर्टसर्किटमुळे उसाच्या शेताला भीषण आग लागली. या आगीत सात शेतकऱ्यांचा सुमारे २५ एकरांतील उभा ऊस जळून खाक झाला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नागेशवाडी शेतशिवारातील विद्युत रोहित्रावर अचानक शॉर्टसर्किट झाले आणि ठिणग्या उडून लगतच असलेल्या गजानन श्यामराव सुरोशे यांच्या शेतातील उसाने पेट घेतला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. सुरुवातीला गजानन सुरोशे यांच्या शेतातील सुमारे दोन एकरांतील ऊस जळून खाक झाला. त्यानंतर आगीने लगतच्या इतर शेतांनाही कवेत घेतले. यामध्ये सुधाकर सुरोशे, संभाजी सुरोशे, पंजाब सुरोशे, दिलीप सुरोशे, सटवाराव सुरोशे आणि गजानन अमृता सुरोशे या शेतकऱ्यांच्या उसाचे अतोनात नुकसान झाले. पाहता पाहता सुमारे २५ एकरांवरील उभा ऊस डोळ्यांदेखत भस्मसात झाला. दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करत जोपासलेले पीक ऐन तोडणीच्या तोंडावर जळाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, गेल्या दोन ते तीन वर्षांत तालुक्यात विविध ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागून नुकसान झालेल्या प्रकरणांत महावितरणने केवळ पंचनामे केले. हे पंचनामे यवतमाळ कार्यालयाकडे पाठवूनही पोफाळी, झाडगाव, तिवरंग, मुळावा, दिवटपिंप्री आणि बेलखेड आदी गावांतील बाधित शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही, अशी तक्रार पोफाळी येथील शेतकरी किरण क्षीरसागर यांनी केली आहे. जुन्या नुकसानीची भरपाई प्रलंबित असतानाच आता नागेशवाडीतील आगीने शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. शासनाने या घटनेचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी आणि जुन्या प्रलंबित भरपाईचा प्रश्नही त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.