

नायगाव : नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पोस्टमार्टेम विभागात वीजपुरवठा नसल्याने एका मृत व्यक्तीचे शवविच्छेदन चक्क वाहनाच्या हेडलाईटच्या उजेडात करण्यात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणलेल्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम करताना पोस्टमार्टेम कक्षात पुरेशा प्रकाशाची व्यवस्था उपलब्ध नव्हती. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था देखील नसल्याचे दिसून आले. त्यामुळे खाजगी रुग्णवाहिकेच्या प्रकाशाच्या सहाय्याने शवविच्छेदन प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकाराचे काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना शासनाच्या आरोग्य त्सेरवांवर अवलंबून राहावे लागते. मात्र अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा सरकारी यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, पोस्टमार्टेमसारखी संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया अत्याधुनिक सुविधा, स्वच्छता व पुरेशा प्रकाश व्यवस्थेत होणे अपेक्षित असताना, वाहनाच्या उजेडात शवविच्छेदन करावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे संबंधित रुग्णालय प्रशासनाने याबाबत नेमकी काय खबरदारी घेतली होती, वीजपुरवठ्यासाठी जनरेटर अथवा अन्य पर्यायी व्यवस्था का उपलब्ध नव्हती, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना तात्काळ निलंबित करावे तसेच संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडून केली जात आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ग्रामीण रुग्णालयांमधील मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचीही मागणी होत आहे.
नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
▪️ पोस्टमार्टेम कक्षात वीज नसणे ही गंभीर निष्काळजीपणा.
▪️ पर्यायी वीज व्यवस्थेचा अभाव प्रशासनाच्या उदासीनतेचे द्योतक.
▪️ ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची दुरवस्था पुन्हा समोर.
▪️ दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी.
▪️ सर्व ग्रामीण रुग्णालयांच्या सुविधांची तातडीने तपासणी करण्याची गरज.
"मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावनांचा विचार करता अशा प्रकारची अनागोंदी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाऊ नये. संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे," अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.