नांदेड - 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेतील पैसे दुसऱ्याच पुरुषांचे आधार कार्ड व बँक अकाउंट वापरून फसवणूक करणाऱ्या मनाठा (ता. हदगाव) येथील 'सीएससी' केंद्रचालकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. सोबतच अशा प्रकारची कुठे फसवणूक झाली तर नाही ना, याबाबतही चौकशी करावी असे निर्देशात म्हटले आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यातील मनाठा गावात ही फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील महिलांच्या हक्काचे पैसे पुरुषांच्या आधार लिंक असणाऱ्या खात्यावर परस्पर लाटल्याचा प्रकार मनाठा येथे उघडकीस आला आहे. मनाठा येथील सचिन 'सीएससी' सेंटर चालकाने महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेताना इतर पुरुषांकडून आधारकार्ड व ते लिंक असणारे बँक अकाऊंट अपलोड केले. पुरूषांच्या आधार कार्डवर महिलांचे फोटो बनावट पद्धतीने अपलोड केले. महिलांचे नाव व आधारकार्डवर महिलांचे फोटो असल्यामुळे छाननीमध्ये सदरचा अर्ज महिलांनीच भरलेला आहे, असे दिसून आले. परंतु, आधार क्रमांक व त्याला लिंक असलेल्या बँक खाते हे इतर पुरुषांचे होते. त्यामुळे महिलांच्या खात्यात जमा होणारा पैसा या पुरुषांच्या खात्यावर आला. याबाबत प्राथमिक चौकशी केली असता, ७१ हजाराची रक्कम वळती करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मनाठ्याचे मंडळ अधिकारी पांडुरंग गिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सचिन भुजंगराव थोरात याच्याविरुद्ध मनाठा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
ज्यांच्या खात्यात हे पैसे आले त्या पुरुषांनाही याची कल्पना नव्हती. नंतर त्याचा अंगठा घेऊन सदरचा पैसा काढून घेण्याचा प्रयत्न सदरच्या 'सीएससी' केंद्र चालकाने केला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर सदरच्या केंद्रचालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे इतरत्र कुठे गडबड करण्यात आलेली आहे का? याबाबतही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.