

Nanded News Low height bridges danger citizens
जळकोट, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अनेक रस्त्यांवर कमी उंचीचे पूल असल्याने दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांचा जीव धोक्यात येतो. पुराच्या पाण्याखाली जाणारे हे खुजे पूल वाहतुकीसाठी घातक ठरत असून, प्रशासनाचे याकडे कायम दुर्लक्ष असल्याने संताप व्यक्त होत आहे.
माळहिप्परगापाटोदा खुर्द मार्गावरील पुलावर १६ सप्टेंबर रोजी एक भीषण अपघात घडला. एका आटोरिक्षासह पाच प्रवासी पुलावरून वाहून गेले. त्यापैकी दोन प्रवासी बेपत्ता होऊन नंतर मृतावस्थेत सापडले, तर दोन जणांनी पोहून आपले प्राण वाचवले. पाचवा प्रवासी, विठ्ठल धोंडीबा गवळे (वय ५६, रा. पाटोदा बु.) यांचे प्राण मात्र एका झाडामुळे वाचले. रात्री एक वाजेपर्यंत ते पुराच्या पाण्यात त्या झाडाला धरून बसले होते.
मदत मिळेपर्यंत त्यांनी झाडाचा आधार सोडला नाही. पुलाने दोनांचे प्राण घेतले; तर एका प्रवाशाला झाडाने तारले, अशी हृदयद्रावक घटना घडली. फक्त माळहिप्परगापाटोदा खुर्दच नव्हे, तर जिरगाढोरसांगवी, वांजरवाडाहोकर्णा, कोळनूरमाळहिप्परगा अशा अनेक मार्गावरील पूल कमी उंचीचे असल्याने पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पूल पाण्याखाली जातात आणि धोकादायक ठरतात.
याबाबत वारंवार मागण्या होऊनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सरपंचांनी प्रशासनाला एकमुखी मागणी केली आहे की, नागरिकांच्या जीवितहानीला आळा घालण्यासाठी सर्व कमी उंचीच्या पुलांची उंची तातडीने वाढवावी. सरपंच सुनीता केंद्रे (माळहिप्परगा), ज्योत्स्ना दळवे पाटील (रावणकोळा), संध्या चोले (कोळनूर), अनुराधा भालेराव (मंगरुळ), सत्यवान पाटील (हाळदवाढवणा), चंद्रशेखर पाटील (अतनूर), सुनील नामवाड (पाटोदा बु.), पूजा गोरखे (मरसांगवी), जयश्री राठोड (शिवाजीनगर), ललिता सातापुरे (डोंगरगाव), शिरीष चव्हाण (सुल्लाळी) व ललिता गिते (पाटोदा खुर्द) आदींनी शासनाचे लक्ष वेधले आहे. दरवर्षी जीवितहानी होऊनही प्रशासन हलगर्जीपणा करत आहे. "आणखी किती जीव गेले की हे पूल उंचावले जातील?" असा सवाल तालुक्यातील जनता व सरपंचांनी उपस्थित केला आहे.