लोहा : लोहा तालुक्यात मागच्या चार-पाच दिवसांपासून सतत धार पाऊस असल्यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून धानोरा मक्ता येथे रस्त्याची मागणी करून कोणत्याही लोकप्रतिनिधीने ती पूर्ण केली नाही. त्यामुळे येथील लोकांना अंत्यविधीसाठी पाण्यातून रस्ता काढून अंत्यविधी करावा लागत आहे. त्याचाच प्रत्यय काल आला आहे. येथील एका वयोवृद्धाचे निधन झाल्यामुळे त्यांना अंत्यविधीसाठी पाण्यातून वाट काढून अंत्यविधी करण्यात आला.
.
लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता ग्रामपंचायत अंतर्गत गांधीनगर ही वस्ती मागच्या अनेक वर्षांपासून येथे वसलेली आहे. त्यांना जाण्यासाठी साधा रस्तादेखील नाही. अनेक वेळा लेखी निवेदने देऊन लोकप्रतिनिधी, प्रशासनास ही बाब लक्षात आणून देण्यात आली. परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीने या रस्त्यासाठी प्रयत्न केले दिसून आले नाही
दिनांक २६ जुलै रोजी गांधीनगर येथील एका ८५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे सकाळी निधन झाले त्यांच्यावर सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करण्यासाठी जाताना संपूर्ण लोकांना अक्षरश: कंबरे एवढ्या पाण्यातून वाट काढून अंत्यविधी करावा लागला. त्यामुळे येथील रहिवाशांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी विषयी संताप व्यक्त केला आहे अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याचे काम होत नाही, त्यामुळे गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.