

नायगाव : तालुक्यातील अंतर्गाव येथे अवैध वाळू उपसा जोमात सुरू असून प्रशासनाच्या कारवाईनंतरही वाळू माफियांचे मनोबल कमी झालेले नाही. कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले, उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपतेवार तसेच नायगावचे तहसीलदार डॉ. धर्मप्रिय गायकरवाड यांनी नुकतीच धडक कारवाई करत तीन बोटी उडवल्या होत्या. मात्र, या कारवाईनंतर अवघ्या दोन-तीन दिवसांतच पुन्हा मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मागील काही दिवसांपासून रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्या वाळू चोरी सुरू असल्याचे दिसून येत आहे. वाळू माफियांनी खुलेआम वाहतूक करत नदीपात्रातून वाळू उपसा सुरू ठेवला आहे. यामागे महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांचे मौन समर्थन असल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तलाठी व मंडळ अधिकारी यांना वारंवार माहिती देऊनही ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येते. उलट माहिती विचारल्यास टाळाटाळ केली जाते किंवा फोन उचलणे टाळले जाते, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
तहसील प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे वाळू माफियांना जणू मोकळे रान मिळाले असून, नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून ती ट्रक व टिप्परद्वारे विक्रीसाठी नेली जात आहे. या सर्व प्रकाराकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
“मी करतो मारल्यावाणी… तुम्ही करा रडल्यावाणी!”
नायगाव तहसील प्रशासनाचा सध्याचा कारभार पाहता “मी करतो मारल्यावाणी आणि तुम्ही करा रडल्यावाणी” अशीच परिस्थिती निर्माण झाल्याची टीका नागरिकांमधून होत आहे. एका बाजूला पोलिसांकडून बोटी उडवून कारवाई केल्याचे दाखवले जाते, तर दुसऱ्याच दिवशी वाळू माफिया पुन्हा पूर्ववत काम सुरू करतात. यावरून ही कारवाई केवळ दिखावा तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महसूल विभागाच्या निष्क्रियतेमुळे वाळू माफियांना जणू अभय मिळाले असून, “कारवाई होते आणि लगेचच सर्व काही पूर्ववत सुरू होते” हा प्रकार नागरिकांच्या रोषाचा विषय ठरत आहे. प्रशासनाने आता तरी ठोस व सातत्यपूर्ण कारवाई करून वाळू माफियांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.