

Naygaon Kuntur Liquor Seizure
नायगाव : बेकायदेशीररित्या देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कुंटूर पोलिसांनी धडक कारवाई करत कारसह एकूण २ लाख ३० हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवार (दि.२४) रोजी सायंकाळी करण्यात आली.
पोलीस स्टेशन कुंटूर येथील पोलीस उपनिरीक्षक मल्लीकार्जुन कारामुंगे हे पथकासह अवैध धंद्यांवर कारवाई करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सायंकाळी सुमारे ५.३० वाजता कुंटूर ते सांगवी मार्गावरील सांगवी पाटीजवळ छापा टाकण्यात आला. यावेळी संशयित (क्र. एमएच-१२-केएन-६०६३) या कारची तपासणी केली असता, त्यामध्ये विनापरवाना देशी दारूचा साठा आढळून आला.
कार चालक अखलाख शादुल खुरेशी (वय २५, व्यवसाय मजुरी, मूळ रा. भिवंडी जि. ठाणे, सध्या भिमगड कंधार ता. कंधार, जि. नांदेड) याच्याकडून ‘भिंगरी संत्रा’ लेबल असलेल्या १८० एमएलच्या ३३६ बाटल्या व ९० एमएलच्या १०० बाटल्या असा एकूण ३० हजार ८८० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. तसेच सुमारे २ लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली. एकूण २ लाख ३० हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गजानन चापलकर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन कुंटूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७/२०२६ अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) व ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोहन कंधारे हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल डी. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मल्लीकार्जुन कारामुंगे, पोहेकॉ मोहन कंधारे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील हंबर्डे व गजानन चापलकर यांनी पार पाडली.