

नायगाव : बहुचर्चित सेवा सहकारी सोसायटी नरसीच्या निकालाचे पारडे आज (दि. २०) सहकार कार्यालय नायगाव येथे झालेल्या इन कॅमेरा फेर मतमोजणीत बदलले. भाजप नेते श्रावण पाटील भिलवंडे यांच्या पॅनलचा एक मताने झालेला पराभव आता एक मताने विजयी झाला. या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून न्यायालयीन लढाईत पारडे बदल्याने सत्तेचे स्वप्न बघणारे आज तरी सत्ते पासून दूर गेले आहेत.
नरसी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अटीतटीमध्ये १६ मार्चरोजी झाली होती. शेवटच्या क्षणापर्यंत मतमोजणी काट्यावर झाली. एकूण १३ जागेपैकी श्रावण पाटील यांच्या आपलं पॅनलच्या ६ तर बाकी सर्व एक होऊन तयार केलेल्या ग्रामविकास पॅनल चे ७ जागा विजयी झाल्याने बहुमताचा आनंद त्यांनी मोठ्या प्रमाणात साजरा केला होता. ग्रामविकास पॅनलची एक जागा टॉस वर गेली होती. तरी समाधान मानत एक जागा दोन मतांनी आली यात समाधान मानत विजयाचा आनंद साजरा केला होता.
पण श्रावण पाटील यांनी विरोधी पॅनलची दोन मतांनी विजयी झालेल्या जागेवर हरकत घेतली होती. पण मतमोजणी वेळी मान्य झाली नाही. जिल्हा उपनिबंधक यांच्या कडे हरकत आल्याने या नुसार जिल्हा उपनिबंधकाच्या आदेशानुसार नरसी सेवा सहकारी सोसायटीच्या एका जागेची फेर मतमोजणी येथील सहायक निबंधक कार्यालय नायगाव येथे २० मार्च गुरुवारी दुपारी इन कॅमेरा व कडेकोट पोलीस बंदोबस्तात सहकार कार्यालय नायगाव येथे पार पडली.
यावेळी भाजप नेते श्रावण भिलवंडे यांच्या गटाचे जनाजी खनपटे २ मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एन. एस. होनराव यांनी जाहीर केले. या एका विजयामुळे श्रावण भिलवंडे यांच्या गटाची सदस्य संख्या ७ झाली असून संभाजी भिलवंडे, भास्कर भिलवंडे, रवींद्र भिलवंडे, व लोहगावे यांच्या ग्रामविकास पॅनेलचा आनंद फार काळ टिकला नाही.
जिल्हात व जिल्हाबाहेर चर्चेची ठरलेली नरसी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक दि. १६ मार्च रोजी पार पडली. मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीला ७ जागा तर भाजप नेते श्रावण भिलवंडे यांच्या गटाला ६ जागा मिळाल्या होत्या. मात्र, अनुसूचित जाती व भटक्या जमाती गटातून महाविकास आघाडीचे निवडून आलेले पांडुरंग बागडे यांच्या निवडीबद्दल आक्षेप घेण्यात आला. या जागेची फेर मतमोजणी घेण्यात यावी, असा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे भाजपच्या उमेदवाराने केला होता.
निवडणूक निकाला वेळी फेर मतमोजणी करण्यात आली नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाला जिल्हा उपनिबंधकाच्या कोर्टात आव्हान देण्यात आले. यावर १९ मार्चरोजी सुनावणी झाली आणि २० मार्चरोजी तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन कडेकोट पोलिस बंदोबस्तात व राखीव दलाच्या तुकड्या बोलावून एका जागेची फेर मतमोजणी केली. यामध्ये एकट्या पडलेल्या श्रावण पाटलाला अगोदर एका जागेवर चिठ्ठीने, तर फेर मतमोजणी मध्ये नशिबाने साथ दिली. आपली पूर्वी असलेली सत्ता गेल्या नंतर पुन्हा मिळवण्यात त्यांना यश मिळाले आहे. या विजयाचा आनंदोत्सव नरसी गावात व परिसरात श्रावण पाटील मित्र मंडळ यांनी मोठ्या प्रमाणात साजरा केला.
सर्व मातब्बर एकत्र येऊन माझ्या एकट्याच्या विरोधात लढले अटीतटीचा सामना हाच माझा विजय ठरला होता. पण फेर मत मोजणीत आमची जागा विजयी होणे, हा जनतेचा विजय आहे.
- भाजप नेते, श्रावण पाटील भिलवंडे, आपलं पॅनल प्रमुख
उप जिल्हा निबंधक यांनी शहानिशा न करता एकतर्फी मत मोजणीचे दिलेले आदेश कायदेशीर आहेत. या विरोधात ग्रामविकास पॅनलने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा विजयाचा आनंद औट घटकेचा राहील.
- संभाजी भिलवंडे, ग्रामविकास पॅनल प्रमुख