

नायगाव : दिवाळीच्या लक्ष्मीपूजनानंतर आनंदाचे वातावरण असताना नायगाव शहरातील नरसी रोडवरील कल्याण कॉप्लेक्स मधील सह्याद्री गारमेंट या कापड दुकानाला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी (दि. ९) पहाटे उघडकीस आली. या आगीत दुकानातील कपडे व इतर साहित्य जळून खाक झाले असून, अंदाजे 50 लाखच्या वर रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचे कारण अद्याप उघड झाले नाही.या घटनेमुळे दुकान मालक संतोषी शेषराव शिंदे कोकलेगावकर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
नायगाव येथील नरसी रोड वरील कल्याण कॉम्प्लेक्समध्ये, कॅनरा बँकेजवळ असलेल्या सह्याद्री गारमेंट या दुकानाला लक्ष्मीपूजनानंतर रात्रीच्या सुमारास आग लागली. सोमवारी पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. पहाटे सहा वाजता शेजारचे दुकान दार कोकुलवार हे नेहमी प्रमाणे सकाळी सहा वाजता दुकानातून सामान काढायला गेल्या नंतर धूर व आग दिसू लागली घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे संपूर्ण गावात पसरले. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी मदतीचा हात पुढे केला.
घटनेची माहिती मिळाल्या नंतर एक तासांनी नायगाव नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाचे जवान आणि उपस्थित नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने दुकानातील कपडे आणि अन्य साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने दुकानाच्या शेजारी असलेले सेतू केंद्र, दुग्धजन्य पदार्थांचे दुकान तसेच कॅनरा बँक आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून ग्रामस्थ यांनी केलेल्या प्रयत्नाने बचावली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पती पत्नीने कष्टाने उभे केलेले स्वप्न आगीत भस्मसात!
या घटनेतील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे शेषराव शिंदे व त्याचा बंधू नायगाव शहरातील नामांकित कापड दुकानात मुनिम होते.दोघांच्या अनुभवातून हे दुकान थाटले होते.शेषराव व संतोषी शिंदे यांचा हे दुकान प्रसिद्धीस यावे हा खटाटोप करीत संघर्ष चालू होता. अनेक दिवस कापड दुकानात मुनिम म्हणून नोकरी करून त्यांनी अनुभव मिळविला. त्यानंतर जवळचे जमा भांडवल आणि बँकेचे कर्ज यांच्या बळावर पत्नीच्या सहकार्याने चार वर्षांपूर्वी सह्याद्री गारमेंट या दुकानाची सुरुवात केली होती. मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने उभा केलेला व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू असताना आगीच्या या दुर्घटनेने त्यांच्या स्वप्नांची अक्षरशः राखरांगोळी केली आहे.
दिवाळीच्या सणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील व्यापारी व नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गावकऱ्यांची माणुसकी धावली मदतीला!
सह्याद्री गारमेंटला आग लागल्याचे समजताच सकाळच्या वेळी अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांसोबत नागरिकांनीही आग विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शेजारील दुकाने आणि कॅनरा बँकेपर्यंत आग पोहोचू नये यासाठी सर्वांनी मदत केली. नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठे नुकसान टळले; मात्र शिंदे कुटुंबाचा चार वर्षांचा संघर्ष आगीने हिरावून घेतल्याची भावना उपस्थित सर्वांच्या तोंडून व्यक्त होत आहे.