

Godavari River Sand Mining Naigaon
नायगाव : तालुक्यातील ईजतगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर पोलिस आणि महसूल प्रशासनाने संयुक्त धडक कारवाई करत रेती माफियांना मोठा धक्का दिला. या कारवाईत संपूर्ण यंत्रणा जप्त करून नष्ट करण्यात आली.
कुंटूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले तसेच उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संजय निलप्रत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मागील काही दिवसांपासून रेती माफियांनी बोट, तराफे आणि त्यावर जंक्शन पंप बसवून नदीपात्रातून वाळू उपसा करण्याची नवी पद्धत सुरू केली होती.
स्थानिक पातळीवर प्रशासनाच्या दुर्लक्षाची चर्चा सुरू असतानाच पोलिसांनी सायंकाळी अचानक छापा टाकत हा अवैध प्रकार उधळून लावला. या वेळी तराफे, बोटी आणि जंक्शन मशीनसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर जिलेटिनच्या साहाय्याने ही यंत्रणा नष्ट करण्यात आली. या कारवाईत लाखो रुपयांचे साहित्य उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे.
सध्या नांदेड जिल्ह्यात एकाही वाळू घाटाचा लिलाव झालेला नसतानाही रेती माफियांनी नायगाव तालुक्याकडे मोर्चा वळवला आहे. इतर भागातील वाळू कमी झाल्याने गोदावरी पात्रावर ताण वाढल्याचे दिसून येत आहे. वाढत्या अवैध उत्खननाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि उपअधीक्षक श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
बिलोलीचे पोलीस उपविभागीय अधिकारी पानेगावकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई पार पडली. नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. या संयुक्त कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, प्रशासनाने अशाच प्रकारच्या सातत्यपूर्ण कारवाया केल्यास गोदावरी नदीचे होणारे नुकसान रोखता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दुसरीकडे, सांगवी परिसरात अजूनही अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत असून, महसूल प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.