

उमरखेड : पैनगंगा नदीपात्रातील मुरली बंधाऱ्यात दोन महिन्यांपूर्वी आढळलेल्या एका अनोळखी व्यक्तीच्या खून प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले आहे. मृतदेहाचा डीएनए संशयित आरोपीच्या मुलाशी जुळला नसल्याने या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले असून, पोलिसांसमोर ओळख पटविण्याचे मोठे आव्हान उभे आहे.
उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंड परिसरातील मुरली बंधाऱ्यात ९ जानेवारी २०२६ रोजी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. बिटरगाव पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत लगतच्या किनवट तालुक्यातील जलधरा येथील मारोती गंगाराम डुकरे (वय ६०) यांचा मृतदेह असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता.
मृत व्यक्तीचा मुलगा प्रदीप मारोती डुकरे याने वडिलांचा खून करून मृतदेह नदीत फेकल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. ओळख निश्चित करण्यासाठी मृतदेहाचे केस आणि त्वचेचे नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. मात्र, नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालात मृतदेहाचा डीएनए आणि प्रदीप डुकरे यांचा डीएनए परस्पर जुळत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिस तपासाला नवे वळण मिळाले असून संबंधित मृतदेह नेमका कुणाचा, हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत पुन्हा उत्खनन करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. अधिक स्पष्ट निष्कर्षासाठी मृतदेहातील ‘ बोनमॅरो' (अस्थिमज्जा/हाडातील मज्जा) नमुने संकलित करून ते पुन्हा न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. अंत्यसंस्कार झाल्यानंतरही पुन्हा उत्खनन करून नमुने घेण्याची वेळ आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आता नव्या फॉरेन्सिक अहवालावरच या संपूर्ण खून प्रकरणाचा पुढील तपास आणि सत्य अवलंबून असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पांडुरंग शिंदे करत आहेत