

मुखेड : एकीकडे कडक उन्हाळा असताना, मुखेड न.प. कडुन होणारा पाणी पुरवठा 3 दिवसाआड होत आहे. नादुरुस्त हातपंप दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे शहरातील कृत्रिम पाणीटंचाईमुळे नागरीकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुखेड शहराला पाणी पुरवठा केला जात असलेल्या कुद्राळा धरणात पुरेसा पाणीसाठा असताना, नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी कंत्राटदाराला सोयीचे व्हावे म्हणुन शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. त्यात बदल करुन आता 3 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. तो करत असताना किमान एक तास पाणी पुरवठा केला जातो. पण शहरातील प्रभाग क्र.4 शिवाजीनगरला मात्र अर्धा तासच पाणी सोडले जात आहे. ह्या संदर्भात त्याची तक्रार विद्यमान पाणी पुरवठा सभापतीकडे करुन ही फारसा फरक न पडल्याने अर्ध्यातासात दैनदिन पाणी साठवुन ठेवण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
वाढता उन्हाळा त्यात कुलरचा वापरासाठी लागणारे पाणी अर्ध्यातासात कसे साठवुन ठेवावे असा प्रश्न नागरिक करत आहेत. एक तास पुरवठा झाल्यास पुढील 3 दिवसासाठी साठवण ठेवता येते. पण विद्यमान सभापती नवीन नळ योजनेसाठी कंत्राटदाराला सहकार्य करण्यात सक्रिय असल्याने नागरीकाच्या अडचणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रभाग क्र. 4 मधुन भाजपाचा एक नगरसेवच बिनविरोध व दुसरा नगरसेवक मताधिक्याने निवडुन दिला. ह्या प्रभागाला न.प. उपाध्यक्ष पद मिळाले असताना भाजपाचे पाणी पुरवठा सभापती का सापत्नपणाची वागणुक देतात हे न उलगडणारे कोडे आहे. वरिष्ठ नेत्यानी हे कोडे साडवावे गरज पडल्यास पाणी पुरवठा सभापती बदलावा पण शहरातील इतर भागा प्रमाणे प्रभाग चार ला एक तास सोडण्याची सोय करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कंत्राटदार धाजिॅण्य सभापती च्या कामाची ही माहीती घ्यावी, शहरात अनेक ठिकाणी लिकेजमुळे पाणी वाया जात आहे. ह्याकडे व पाणी टंचाई भासु नये म्हणुन शहरात हातपंप आहेत, पण ते नादुरुस्त असल्यामुळे त्याचा उपयोग घेता येत नाही. प्रभाग 3 मधील हातपंप दुरुस्तीसाठी तेथील नगरसेवक व बांधकाम सभापती हेमंत घाटे पाठपुरावा करीत आहेत. प्रभाग 9 मध्ये हातपंप दुरुस्त करण्याची मागणी शे.का.प.चे आसद बल्की यांनी तहसिलदारांना निवेदन देवुन मागणी केली आहे. मुखेड शहरात किमान एक तास पाणी सोडण्यासाठी सभापतीनी लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.