

Nanded-Medchal DEMU Railway Fire News
नरेंद्र येरावार
उमरी, पुढारी वृतसेवा : नांदेड-मेडचल डेमू रेल्वे सोमवारी (दि.६) पहाटे बोळसा रेल्वेस्थानकावर येताच एका डब्याखालून अचानक मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे लक्षात येताच रेल्वेला आग लागली पळा.. पळा... पळा... म्हणत प्रवाशांनी आरडा ओरडा करत रेल्वेतून उड्या मारून पळत सुटले. रेल्वे गाडीला आग लागली नव्हती. रेल्वेचे ब्रेक जाम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात काळा धूर निघत होता. त्यामुळे प्रवासी भयभीत झाले होते. रेल्वेतील इंजिन चालक, गार्डच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेची अधिक माहिती अशी की, सदर घटना उमरी तालुक्यातील बोळसा रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत रेल्वेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. १५ मिनिटे रेल्वे बोळसा स्थानकावर थांबवून ठेवत जाम झालेले ब्रेक दुरुस्ती केल्यानंतर मेडचलकडे रवाना झाली.
नांदेड ते मेडचल रेल्वे (गाडी क्रमांक ७७६०६) ही नांदेड रेल्वे स्थानकावरून सोमवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास मेडचलकडे रवाना झाली. ही रेल्वे उमरी रेल्वे स्थानकातून सुरळीत पुढे निघाली. परंतु बोळसा रेल्वेस्थानक येताच रेल्वेच्या एका डब्याखालून मोठ्या प्रमाणात धूर निघाला. त्यामुळे रेल्वे स्थानकावर थांबताच रेल्वेतील असंख्य प्रवाशांनी रेल्वेला आग लागली पळा पळा पळा म्हणत ओरडत रेल्वेतून उड्या मारून पळ काढला. एका डब्याच्या ब्रेकमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे लक्षात येताच रेल्वेचे चालक आणि गार्ड यांनी प्रसंगावधान राखत जाम झालेले ब्रेक दुरुस्त केले.
रेल्वे प्रवासी रेल्वेतून प्रवास करताना केरकचरा आणि कॅरिबॅग रेल्वेतून सर्रास बाहेर फेकतात. प्रवाशांनी फेकलेला हाच केरकचरा व कॅरिबॅग रेल्वेच्या ब्रेकमध्ये जाऊन अक्षरशः ब्रेक जाम झाले होते. त्यामुळे ब्रेक लाइनरला आग लागली आणि मोठ्या प्रमाणात धूर निघाला. रेल्वेचे चालक आणि गार्ड यांनी वेळीच लक्ष घालून जाम झालेले ब्रेक दुरुस्त केले. अशा परिस्थितीत केवळ पंधरा मिनिटे रेल्वे बोळसा रेल्वेस्थानकावर थांबली होती. यात रेल्वेचे कोणतेही नुकसान झाले नाही किंवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती सिकंदराबाद रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी दिली.