

Loha police two arrested with pistols
लोहा: नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा जणांना स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टल, १४ जिवंत काडतूस, दोन दुचाकी असा एकूण २ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १) सायंकाळी लोहा येथील लातूर रोडवरील शनी मंदिराच्या मागे करण्यात आली.
लोहा येथील शनी मंदिराच्या मागे दोघेजण पिस्टल विक्री करण्यासाठी आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे आणि पथकातील अंमलदार यांना मिळाली. या माहितीवरून पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने सापळा रचून आनंद उर्फ चिन्नू सरदार यादव (वय २४, रा. वजीराबाद चौरस्ता नांदेड) आणि जावेद उर्फ लड्या रहेमत शेख (वय २१, रा. जामा मस्जिदजवळ विष्णुपुरी) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून प्रत्येकी एक गावठी स्टीलची पिस्टल आढळून आली. तसेच प्रत्येकी सात पितळी धातूचे जिवंत काडतूस आणि दोन दुचाकी सापडल्या. या कारवाईत २ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोहा येथे स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेल्या या दोन्ही आरोपींना लोहा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे, पोहेकॉ रविशंकर बामणे, पोकॉ चंद्रकांत स्वामी, पोकॉ अझरुद्दीन शेख, पोकॉ अनिल बिरादार, सायबर सेलचे पोहेकॉ राजू सिटीकर, पोहेकॉ दीपक ओढणे यांनी केली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या या पथकाचे कौतुक केले आहे.