

Loha Sayal young farmer Death
लोहा: तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याचा फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या विवंचनेत सायाळ येथील एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची घटना घडली. अतिवृष्टीनंतर तालुक्यातील ही तिसरी घटना आहे.
सायाळ येथील दिनेश सितलसिंह ठाकूर (वय ३५) हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या नावावर पावणे दोन एकर जमीन आहे. त्यांनी धावरी येथील बँकेकडून कर्ज घेऊन खरीप पिकांची लागवड केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. इतकेच नव्हे तर पुराच्या पाण्याने शेतजमीनही वाहून गेल्याने ठाकूर हतबल झाले होते.
नापिकी व कर्जबाजारीपणामुळे काही दिवसांपासून ते चिंतेत होते. अखेर बुधवारी (दि. १०) सकाळी त्यांनी शेतात जाऊन विष प्राशन केले. तात्काळ नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले, परंतु गुरुवारी (दि. ११) रात्री त्यांचा मृत्यू झाला.
ठाकूर यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी (दि. १२) सायाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिवृष्टीनंतर रिसनगाव, माळेगाव आणि आता सायाळ अशा तीन ठिकाणी शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत.