नायगाव : तालुक्यातील कृष्णर एमआयडीसी परिसरात बुधवारी सकाळी बिबट्याने अचानक हल्ला चढवल्याने श्रीकांत पोपुलवाड हा तरुण गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांत भीतीचे सावट पसरले आहे. जखमी पोपुलवाड यांना तातडीने घुंगराळा येथील डॉ. राठोड यांच्या दवाखान्यात हलवून प्राथमिक उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी रुग्णालयात धाव घेत जखमी तरुणाची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी वनपरिक्षेत्राधिकारी श्री. देवकत्ते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांची टीम तातडीने घुंगराळा-कृष्णर परिसरात दाखल होऊन बिबट्याच्या शोधासाठी मोहिम हाती घेतली.
वनविभागाने परिसरात गस्त वाढवली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पिंजरा लावण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, घुंगराळा, कृष्णर आणि एमआयडीसी परिसरातील नागरिक, शेतकरी, कामगारांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “बिबट्या कुठेही दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा,” असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे.
वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.