

नांदेड: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रस्ते अपघाताची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील रुई फाटा येथे रविवारी (दि.४ जानेवारी) सकाळी झालेल्या एका भीषण दुचाकी अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे दोन्ही तरुण देगलूर तालुक्यातील खानापूर गावचे रहिवासी होते.
नेमकी घटना काय?
रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मारोती चंदू गायकवाड (वय २५) आणि दीपक मारोती घंटेवाड (वय २४) हे दोघे आपल्या दुचाकीवरून कंधारच्या दिशेने जात होते. रुई फाट्याजवळील एका धोकादायक वळणावर दुचाकीचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी, दुचाकी जोरात रस्त्याखाली कोसळली आणि या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अपघातात वापरलेल्या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती आणि तरुणांकडे कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नव्हती.
अखेर पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलवरून संपर्क साधून त्यांची ओळख पटवली. ग्रामस्थांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. हे दोन्ही तरुण सकाळी एवढ्या लवकर कुठे निघाले होते, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेमुळे खानापूर गावावर शोककळा पसरली आहे.