

संघपाल वाघमारे
कंधार : बिदर–नांदेड राष्ट्रीय महामार्गावर कंधार तालुक्यातील जंगमवाडी पाटीजवळ मंगळवारी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात पानभोसी येथील दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले राजू लक्ष्मण डुबुकवाड (वय ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३१ सीएस ०७५७ क्रमांकाची झायलो कार बिदरवरून नांदेडकडे येत असताना, कंधारकडून शिरूरकडे जाणाऱ्या एमएस २६ सी क्यू २९८२ क्रमांकाच्या मोटरसायकलला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर कारचे नियंत्रण सुटून तिने एमएच २६ सी आर ७६८६ या अन्य वाहनालाही जबर धडक दिली. त्यानंतर कार रस्त्याच्या पलीकडे जाऊन खोल दरीत कोसळली.
या अपघातात मोटरसायकलवरील राजू डुबुकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पानभोसी गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातात विजय संभाजी अमृतवाड (वय २५, रा. बागलगाव ता. मुखेड) यांचा उजवा पाय घोट्याजवळून तुटला असून शुभम नारायण तिगोटे (वय २६, रा. रिसनगाव ता. लोहा) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना कंधार ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी विष्णुपुरी, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, झायलो कारमधील पंजाब येथील दोन महिला व एक पुरुष यांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी घटनेचा पंचनामा केला.