

Himayatnagar petrol diesel crisis
हिमायतनगर : शहरातील नागरिकांना सध्या मूलभूत गरजांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बँकांमध्ये दिवसभर रांगेत उभे राहूनही स्वतःच्या खात्यातील पैसे मिळत नाहीत, पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा आहे, तर गॅस एजन्सींवर सिलिंडर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना उन्हात भटकंती करावी लागत असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या या शहरात चार पेट्रोल पंप असूनही इंधनासाठी मोठी गर्दी होत आहे. शुक्रवारी (दि.१) सकाळी पळसपूर रोडवरील एका पंपावर ट्रॅक्टर व दुचाकीस्वारांना पेट्रोल वितरित करण्यात आले. दुपारपर्यंत येथे मोठी गर्दी झाली होती. मुख्य रस्त्यावरील तीन पेट्रोल पंप गुरुवारपासून बंद असल्याने ट्रॅक्टर, टेम्पो आणि दुचाकींच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पंप चालक मनोज राऊत यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात इतर ठिकाणी पेट्रोल पंप सुरू असताना हिमायतनगरमध्ये वारंवार तुटवडा का निर्माण होतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही पंप चालक जाणीवपूर्वक साठा ठेवून रात्री उशिरा जास्त दराने इंधन विक्री करत असल्याचीही चर्चा आहे. शुक्रवारी दुपारनंतर काही ठिकाणी डिझेल उपलब्ध झाले असले तरी तुटवड्याचा प्रश्न कायम आहे.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने नागरिकांची ये-जा वाढली आहे. मात्र, पैसा, पेट्रोल आणि गॅस टंचाईमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काहींना तर पेट्रोलअभावी लग्नसमारंभांना हजेरी लावता आली नाही. काही पेट्रोल पंप पुन्हा सुरू झाले असले तरी दिवसाआड इंधन टंचाई जाणवत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.