किनवट : किनवट शहरात एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जमीन खरेदीमध्ये भागीदारी देण्याचे आमिष दाखवून एका डॉक्टर दाम्पत्याची तब्बल ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
डॉ. सारिका सुरेंद्र जन्नावार (वय ४६, रा. डॉक्टर लाईन, किनवट) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुषा विठ्ठलराव मुन्नरवार (रा. किनवट), गोविंद साबन्ना जेठेवार आणि श्रीपाद अंबादास जेठेवार (दोघेही रा. गोकुंदा, ता. किनवट) या तिघांनी संगनमत करून हा गुन्हा केला. १५ सप्टेंबर २०२३ ते १९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत आरोपींनी सुशील मशिनरी शॉपमध्ये डॉ. जन्नावार आणि त्यांच्या पतीला जमीन खरेदीत भागीदारी देण्याचे आमिष दाखवले.
या आमिषाला बळी पडून डॉक्टर दाम्पत्याने आरोपींना रोख स्वरूपात ४६ लाख रुपये दिले. मात्र, ठरल्याप्रमाणे आरोपींनी जमिनीचा व्यवहार पूर्ण केला नाही. संबंधित जमीन डॉक्टर दाम्पत्याच्या नावावर न करता ती परस्पर इतरत्र विकून टाकली. तसेच, घेतलेले पैसेही परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली.
याप्रकरणी डॉ. जन्नावार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवारी (दि. १९) सायंकाळी उशिरा किनवट पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक १९२/२०२५ नुसार नोंदवला आहे. अर्ज चौकशी आणि इतर प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी फिर्यादी स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून त्यांनी तक्रार दाखल केल्याने गुन्हा नोंदवण्यास काहीसा विलंब झाल्याचे समजते.

पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर झाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपींना लवकरच अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील फसवणुकीचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.