

हदगाव : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात हदगाव तालुक्यातील ११ गावातील शेतकरी आक्रमक झाले असून मानवाडी फाटा येथील नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि.१५) शेतकऱ्यांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी होत हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी प्रशासनाला सज्जड दम दिला. “माझ्या तालुक्यातील शेतकरी बांधवांना कोणत्याही परिस्थितीत भूमिहीन होऊ देणार नाही, महामार्गासाठी एक इंचही जमीन जाऊ देणार नाही,” अशी ठाम ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडून शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गासाठी जमिनींची मोजणी सुरू करण्यात आली होती. मात्र, सुपीक जमिनी हातातून जाण्याच्या भीतीने स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ही मोजणी प्रक्रिया रोखून धरली. महामार्गासाठी जमीन न देण्याच्या आपल्या भूमिकेवर शेतकरी ठाम असून, त्यांच्या या अस्तित्वाच्या लढ्याला तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सक्रिय पाठिंबा दर्शवला.
नांदेड-नागपूर महामार्गावर वाहतूक ठप्प
याच विरोधाची धार तीव्र करत तालुक्यातील बाधित ११ गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येत मानवाडी फाटा येथे नांदेड-नागपूर महामार्ग रोखून धरला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहात आमदार कोहळीकर यांनी शासनाचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधले.
आंदोलक शेतकऱ्यांना संबोधित करताना आमदार बाबूराव कदम कोहळीकर म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुमची एक इंचही जमीन या महामार्गासाठी जाऊ देणार नाही.” आगामी विधिमंडळ अधिवेशनात हा जनहिताचा प्रश्न सभागृहात आक्रमकपणे मांडून या प्रस्तावित महामार्गाला तीव्र विरोध करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या आंदोलनात माजी खासदार सुभाष वानखेडे, काँग्रेसच्या नेत्या रेखाताई चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर यांच्यासह परिसरातील ११ गावांतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांचा वाढता रोष आणि लोकप्रतिनिधींनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता,शासन या प्रकल्पाबाबत नेमका काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.