Nanded News : दुष्काळ अन् कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्याने संपवले जीवन

हदगाव तालुक्यातील वाळकी बाजार येथील घटना; कुटुंबाला आर्थिक मदतीची ग्रामस्थांची मागणी
Ended life
Ended lifePudhari Photo
Published on: 
Updated on: 

हदगाव : सततची नापिकी, गतवर्षीचा ओला दुष्काळ आणि यंदाच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतीचे झालेले नुकसान, त्यातच खासगी फायनान्स कंपनीच्या कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेतून हदगाव तालुक्यातील वाळकी बाजार येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवले. अशोक सखाराम कदम (वय ४४) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, १९ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

अशोक कदम यांच्याकडे अल्प जमीन होती. सततच्या प्रतिकूल हवामानामुळे तसेच गेल्या दोन वर्षांतील दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा हातातोंडाशी आलेले पीकही संकटात सापडल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती.

एकीकडे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना दुसरीकडे डोक्यावरील कर्जाचा वाढता बोजा आणि खासगी फायनान्स कंपनीचे हप्ते फेडण्याची चिंता त्यांना सतावत होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

कदम यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, जावई आणि भाऊ असा परिवार आहे. या संकटामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासनाने या पीडित कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news