Nanded Unique Engagement Ceremony : चक्क स्मशानभूमीत रंगला साक्षगंध ! अनोख्या सोहळ्याची सर्वत्र चर्चा

वधू-वरांसह सुमारे ३०० नातेवाईकांची उपस्थिती
Nanded Unique Engagement Ceremony
Nanded Unique Engagement Ceremony Pudhari
Published on: 
Updated on: 
संग्राम मोरे

नवीन नांदेड : अंत्यसंस्कारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिडको येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत रविवारी चक्क मंगल सोहळ्याचा गजर रंगला. सनई-चौघड्यांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी, प्रवेशद्वारावरील आकर्षक रांगोळी आणि सजावट यामुळे स्मशानभूमी परिसराचे रूपच पालटले होते. हा अनोखा सोहळा पाहून परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. सुरुवातीला हा विद्युत शवदाहिनीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असल्याची चर्चा सुरू झाली; मात्र, हा मसनजोगी समाजातील बालाजी पवार यांच्या कन्येचा साक्षगंध सोहळा असल्याचे समोर आले.

कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता अक्षदा पवार हिचा छत्रपती संभाजीनगर येथील रवि गोविंद गायकवाड यांच्यासोबत साक्षगंध सोहळा पार पडला. दोघेही उच्च माध्यमिक शिक्षण घेत असून, दोन्ही कुटुंबांतील नातेवाईक आहेत. या सोहळ्याला वधू-वरांसह दोन्ही कुटुंबांतील सदस्य, नातेवाईक आणि मित्रमंडळी असे जवळपास ३०० जण उपस्थित होते.

स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. संपूर्ण परिसराची स्वच्छता करून सजावट करण्यात आली होती. तसेच शेणाचा सडाही टाकण्यात आला होता. या अनोख्या सजावटीचे छायाचित्र सोशल मीडियावरील समूहांमध्ये प्रसारित होताच, विद्युत शवदाहिनीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, स्मशानभूमीत शुभकार्य आयोजित केल्याचे समजल्यानंतर नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

उदरनिर्वाहाच्या ठिकाणीच शुभकार्य

सिडको येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अनेक वर्षांपासून मसनजोगी समाजातील कुटुंबे अंत्यसंस्कारांची जबाबदारी पार पाडत आहेत. या कामाशी निगडित असल्याने या समाजातील काही कुटुंबांचे वास्तव्यही स्मशानभूमी परिसरात आहे. याच परिसरात राहणारे बालाजी पवार यांनी आपल्या मुलीचा साक्षगंध सोहळा आयोजित केला. मंगल कार्यालयाऐवजी आपल्या रोजच्या जीवनाशी आणि उदरनिर्वाहाशी जोडलेल्या ठिकाणीच मुलीचा शुभकार्यक्रम साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयातून या समाजाच्या जीवनशैलीचे वेगळे वास्तव समोर आले.

मृत्यूच्या ठिकाणी जीवनाचा उत्सव!

स्मशानभूमी म्हटले की मानवी जीवनाचा अंतिम टप्पा आणि अंत्यसंस्कार असे चित्र सर्वसामान्यांच्या डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र, याच ठिकाणी सनई-चौघड्यांचा निनाद, आनंदाचे वातावरण, नातेवाईकांची गर्दी आणि भोजनाची व्यवस्था पाहायला मिळाली. ज्या परिसरात दररोज अंत्यसंस्कार केले जातात, त्याच ठिकाणी एका कुटुंबाने नव्या नात्याची सुरुवात आनंदाने साजरी केली.

मृत्यू आणि जीवन यांची सांगड घालणाऱ्या या अनोख्या साक्षगंध सोहळ्याने समाजाचे लक्ष वेधून घेतले. स्मशानभूमी म्हणजे केवळ दुःखाचे ठिकाण नसून, तेथेही जीवनातील आनंदाचे क्षण साजरे होऊ शकतात, असा वेगळा दृष्टिकोन या सोहळ्यातून समोर आला. या निमित्ताने स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ आणि आकर्षक दिसत असल्याने नागरिकांमध्येही या सोहळ्याची विशेष चर्चा रंगली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.