Nanded Protest | कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी इस्लापुरात किसान सभेचा रास्ता रोको

आंदोलन; तासभर वाहतूक ठप्प, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाईसह विविध मागण्या
Nanded Kisan Sabha Drought Declaration Demand
Nanded Kisan Sabha Drought Declaration DemandPudhari
Published on
Updated on

Nanded Kisan Sabha Drought Declaration Demand

किनवट : पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, किनवट तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शनिवारी (दि. १२) इस्लापूर येथील राज्य महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अर्जुन आडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे सुमारे तासभर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शेकडो शेतकरी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

पावसाअभावी खरीप हंगामातील पिके हातची गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही आगामी काळात गंभीर होण्याची शक्यता असल्याचे किसान सभेने म्हटले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली.

Nanded Kisan Sabha Drought Declaration Demand
Nanded cyber fraud : लोन ॲपच्‍या नावाखाली ५६ लाखांचा गंडा

किनवट तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, खरीप पिकांचे सरसकट पंचनामे करून शंभर टक्के पीकविमा मंजूर करावा, वंचित शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून तातडीने नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच शेतीसाठी दिवसा किमान १२ तास अखंडित वीजपुरवठा करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

रस्ता रोको आंदोलनामुळे राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन स्वीकारले. संबंधित मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.

Nanded Kisan Sabha Drought Declaration Demand
Nanded Rain | उमरखेडमध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर नमाज-ए-इस्तिस्का; मुस्लिम बांधवांची सामूहिक दुआ

यावेळी बोलताना कॉ. अर्जुन आडे म्हणाले, “पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. पिके डोळ्यादेखत जळत असताना शासनाने दुष्काळ जाहीर करण्यास विलंब करू नये.” कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. तसेच सत्ताधारी मंत्री, आमदार आणि खासदारांच्या दारात बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात जनार्दन काळे, मोहन जाधव, आडेलू बोनगीर, सीताराम आडे, शेषराव ढोले, साईनाथ राठोड, विजय जाधव, रंगराव चव्हाण, ज्ञानेश्वर नाईक, शिवाजी आडे, किरवले, दिलीप जाधव, यशवंत राठोड, सुरेखा मेंढके, मधुकर राठोड, सिनू आडे यांच्यासह परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news