

किनवट : तालुक्यातील दिव्यांग नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत खोट्या व बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाच्या योजना व सवलतींचा गैरवापर करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी दिव्यांग संघटनांनी केली आहे. नांदेड जिल्हा सेक्यूलर दिव्यांग मुव्हमेंट व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने नगर परिषद व पंचायत समिती प्रशासनास सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना, सवलती व सुविधा उपलब्ध असतानाही त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीचा अभाव असल्याने अनेक पात्र दिव्यांग लाभांपासून वंचित राहत आहेत. याउलट अपात्र व्यक्ती बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या माध्यमातून शासकीय लाभ घेत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून, यामुळे खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होत आहे.
खोट्या व बनावट प्रमाणपत्रधारकांची सखोल चौकशी करून संबंधित प्रमाणपत्रे रद्द करावीत, चुकीने घेतलेले शासकीय लाभ परत वसूल करावेत व दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या मागण्या पूर्ण झाल्यास खऱ्या दिव्यांग नागरिकांना न्याय मिळेल तसेच शासनाच्या योजनांची पारदर्शक व प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास संघटनांच्या वतीने व्यक्त करण्यात आला. निवेदनावर ॲड. मिलिंद सर्पे, अध्यक्ष नांदेड जिल्हा सेक्युलर दिव्यांग मूव्हमेंट, किनवट आणि भगवान मारपवार, अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, किनवट यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.