

Degloor Janhavi Bhadke National Fellowship Selection
फजल मुल्ला
देगलूर : दृष्टीहीनतेमुळे आयुष्यात अंधार निर्माण झाला असला तरी जिद्द, चिकाटी आणि मोठी स्वप्ने यांच्या जोरावर देगलूरच्या जान्हवी भडके हिने आपल्या कर्तृत्वाचा उज्ज्वल ठसा उमटवला आहे. दृष्टीहीनतेवर मात करत तिने देशपातळीवरील प्रतिष्ठित फेलोशिपमध्ये स्थान मिळवत केवळ स्वतःचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
भारत सरकार आणि नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल पीपल (NCPEDP) यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय निवड प्रक्रियेत देशभरातून केवळ दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव निवड होण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील जान्हवी अविनाश भडके हिने मिळवला आहे.
ही निवड मिळवण्याचा प्रवास अत्यंत आव्हानात्मक होता. कठीण लेखी परीक्षा, मुलाखतीचे विविध टप्पे आणि कसोट्यांचा सामना करताना जान्हवीने आपल्या आत्मविश्वास, अभ्यासू वृत्ती आणि जिद्दीच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली. विशेष म्हणजे, सहानुभूतीची अपेक्षा न ठेवता तिने स्वतःच्या क्षमतेच्या बळावर हे यश संपादन केले.
दोन वर्षांच्या या फेलोशिपअंतर्गत जान्हवी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी, शासकीय योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, सामाजिक प्रश्न आणि त्यांच्या हक्कांबाबत सखोल अभ्यास करणार आहे. दर तीन ते चार महिन्यांनी ती आपला अहवाल NCPEDP च्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सादर करणार असून, यासाठी तिला दरमहा २५ हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे.
स्वतः दृष्टीहीन असतानाही इतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा तिचा निर्धार प्रेरणादायी ठरत आहे. तिचे हे यश केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर आयुष्य बदलता येते, याचे प्रभावी उदाहरण बनले आहे.
शारीरिकदृष्ट्या सक्षम असूनही अनेक जण अपयशाने खचून जातात. मात्र जान्हवीने सिद्ध करून दाखवले की, अपंगत्व हे स्वप्नांच्या आड येत नाही. प्रबळ इच्छाशक्ती आणि ध्येयाप्रती निष्ठा असेल, तर यशाचा मार्ग नक्कीच उजळता येतो. जान्हवीच्या या यशामुळे राज्यातील असंख्य दिव्यांग युवक-युवतींना नव्या आशेचा किरण मिळाला आहे.