

उमरी: तालुक्यातील गोळेगाव येथे किरकोळ कारणावरून एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना दिनांक 8 जानेवारी रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस अटक केली. या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोळेगाव येथील साहेबराव बाळू बोईनवाड (वय 40) यास मारोती चंदू बोईनवाड (वय 37 वर्षे ) याने तू माझ्या पत्नीबद्दल अपशब्द का बोललास म्हणून जाब विचारला तेव्हा दोघात वाद झाला. आरोपी साहेबराव याने मारोती याचा थापडबुक्याने व दगडाने डोक्यात वार करून नालीत फेकून दिले. त्यात त्याचा मृत्यू झाला ही घटना पंचशील बुद्ध विहार गोळेगाव येथे घडली.
घटनास्थळावरील लोकांनी घटनेची माहिती उमरी पोलिसांना दिली यावरून पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक सचिन आरमाळ, अंमलदार अरविंद हैबतकर, शेख फिरोज यांनी घटनास्थळावर जाऊन आरोपीस ताब्यात घेतले व मयत मारोती चांदू बोईनवाड यांचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उमरी ग्रामीण रुग्णालयात पाठवून शवविच्छेदनानंतर अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे.