

नांदेड : महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सतत त्रास देणाऱ्याच्या घरासमोर येऊन महिलेने स्वतःला पेटवून घेतले. ही खळबळजनक घटना नांदेड शहरातील दुल्लेशा रहेमाननगर येथे मंगळवारी (दि. २४) रात्री उशिरा घडली. या प्रकरणात एका तरुणा विरोधात गुरुवारी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील दुल्लेशानगर येथील ३३ वर्षीय महिलेच्या घराजवळ राहणारा शेख मज्जू शेख उस्मान (२४) हा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करीत होता. त्यामुळे या महिलेने मंगळवारी (दि. २४) रात्री सततच्या त्रासाला कंटाळून त्याला व त्याच्या आई-वडिलांना घरी जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी दरवाजा न उघडल्याने या महिलेने सोबत आणलेल्या पेट्रोलची बाटली अंगावर ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले. यात गंभीर भाजल्याने तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिचे वडील सय्यद जिलानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख मज्जू विरोधात गुरुवारी वजिराबाद पोलिस ठाण्यात महिलेस आत्महत्येसास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेची शेख मज्जू सोबत ओळख होती. दोघांच्या वयात आठ वर्षांचे अंतर होते. मात्र दोघांत जवळीकता वाढली नंतर दोघांत बिनसले. शेख मज्जूने २०२३ मध्ये दोघांतील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केला होता.या प्रकरणात तिने दिलेल्या तक्रारीवरून शेख मज्जू विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शेख मज्जूने गुन्हा मागे घे म्हणत पुन्हा त्रास देण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे या महिलेला चार मुली आहेत आणि त्यांच्या दोघांतील संबंधामुळे पतीने तिला २०२३ मध्येच सोडून दिले होते, तर शेख मज्जूचेही लग्न झालेले होते. त्यालाही त्याच्या पत्नीने सोडून दिले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
शेख मज्जू विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने उज्जमाला दाखल गुन्हा मागे घेण्याची मागणी करत त्रास देण्यास सुरुवात केली व आणखी तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी सतत देऊ लागला. या सततच्या त्रासाला कंटाळून उज्जमाने दि. २४ च्या रात्री शेख मज्जूला घरी जाऊन जाब विचारायला गेली, मात्र घराचा दरवाजा उघडला नसल्याने उज्जमाने पूर्वीपासूनच जवळ ठेवलेल्या पेट्रोलची बाटली अंगावर ओतून स्वतःला जाळून घेतले. पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक बोयने करीत आहेत.