

नांदेड : जिल्ह्यात खुनाची श्रृंखला काही केल्या थांबायला तयार नाही. सोनू कल्याणकर याचा सोमवारी पहाटे साडेपाचच्या सहा ते सात जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने सपासप करुन निर्घृण खून करण्यात आला आहे. सलग तिसऱ्या दिवशी पाचवा खून झाला आहे. वेगवेगळ्या घटना असल्या तरी खुनाच्या एकापाठोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे शहरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहरात खुनांच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसत असून, सोमवारी पहाटे अत्यंत गजबजलेला भाग असलेल्या श्रीनगर मध्ये कार मधून आलेले सहा ते सातजणांच्या टोळक्याने सोनू दिगांबरराव कल्याणकर याला आडवून याच्यावर तलवार,खंजर व चाकू अशा धारदार शस्त्राने सपासप वार केले.सोनूच्या अंगावर असंख्य वार केल्याने त्याचा अतिरक्तस्रावामुळे जागेवरच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरज गुरव, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, एलसीबी ची टीम, श्वान पथक व फाॅरेन्सिक टिम घटनास्थळावर दाखल झाली. पोलिस उपलब्ध सिसीटीव्ही कॅमेरा व इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
सोनू कल्याणकर याचा रियल इस्टेट चा व्यवसाय आहे,जमिन खरेदी -विक्री व्यवसायातून त्याच्यावर श्रीनगर भागातच २०२१ मध्ये प्राणघातक हल्ला झाला होता. तो भाजपचा पदाधिकारी असल्याचे समजते, सोनू चे निवासस्थान ही श्रीनगर मध्ये आहे.सकाळी काही कामानिमित्त बाहेर बाहेर पडलेल्या सोनू वर अगोदरपासूनच पाळतीवर असलेल्या टोळक्याने त्याच्यावर नियोजनबध्द पध्दतीने तलवार,खंजर व चाकूने हल्ला करुन खुन करण्यात आला.
या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.सोनूची आई एक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका असून,सोनू ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून ही काम करतो. वंचित बहुजन आघाडीचे नेते शिवा नरंगले याचा तो भाचा असल्याची माहिती आहे.
तीन दिवसांत गॅंगवाॅर मधून शुक्रवारी मध्यरात्री ई-स्क्वेअर परिसरात दोन खुन , शासकीय रुग्णालयात एक असे तीन खून नंतर दुसऱ्या घटनेत शनिवारी रात्री मुरमुरा गल्लीत एकाचा दोन जणांनी तलवारीने खून केला तर तिसऱ्या घटनेत सोमवारी पहाटे सोनू कल्याणकर याचा टोळक्याने खून केला.त्यामुळे तीन दिवसांत पाच खुनाच्या घटनांमुळे नांदेडची गुन्हेगारीने कहर केला आहे ही बाब स्पष्ट होत असून, पोलिसांना आता कडक अॅक्शन घ्यावी लागणार आहे.अन्यथा शहरातील सामाजिक स्वास्थ्य आणखी बिघडेल.