

किनवट : मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला सिंदखेड पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली आहे. ही कारवाई सारखणी येथील कार्तिक मेडिकलजवळ करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून लोखंडी सुऱ्या, टॉमी, सांडस आणि इतर धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास सिंदखेड पोलिसांचे पथक रात्रीच्या गस्तीवर होते. यावेळी मांडवी रोडवरील सारखणी परिसरात त्यांना एक काळ्या-पिवळ्या रंगाची ऑटोरिक्षा संशयास्पदरित्या उभी असलेली आढळून आली. पोलिसांनी तात्काळ ऑटोरिक्षा थांबवून तिची तपासणी केली असता, आतमध्ये सहा जण घातक शस्त्रांसह दबा धरून बसलेले दिसले. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ते सर्वजण मुलतान चिखली (ता. किनवट) येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख फारुख शेख कुरबान (वय ३५), शेख पाशा शेख हमजा (वय ३२), शेख अजीम शेख अवनक (वय ३५), शेख गुलफाम शेख शौकत (वय २३), शेख अफ्रीदी शेख जैरोदीन (वय २५), आणि शेख जलाल शेख शौकत (वय २४) अशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी पाच लोखंडी सुऱ्या, एक धारदार टॉमी, एक सांडस (पक्कड) आणि सहा इतर धारदार हत्यारे जप्त केली आहेत.
याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८८/२०२५ अन्वये, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(४) आणि ४(२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार (आयपीएस), अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, खंडेराव धरणे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर, पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन कुमरे, चालक गोविंद कदम, पोलीस नाईक सतीश कोंडापलकुलवार, रघुनाथ मडावी, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल पवार, संदीप वानखेडे, संजय शेंडे, रविकांत कांबळे, शाम चव्हाण आणि ज्ञानेश्वर वेलदोडे यांच्या पथकाने केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामगिरीबद्दल सिंदखेड पोलिसांचे अभिनंदन केले आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.