

बिलोली : एका दिव्यांग अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास बिलोली येथील न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि. ब. बोहरा यांनी या प्रकरणातील आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास आणि २७ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
ही संतापजनक घटना ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सुमारास नायगाव तालुक्यातील वंजारवाडी येथे घडली होती. पीडित मुलगी ही दिव्यांग असून, घटनेच्या वेळी ती घरी एकटीच होती. याचाच फायदा घेऊन आरोपी योगेश भीमराव कोंडेवाड (वय ३२ वर्ष) याने घराच्या मागच्या दाराने प्रवेश केला आणि तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. पीडितीने दिलेल्या तक्रारीवरून कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३७६ (२) (ल), ४५२ आणि पोक्सो कायद्यासह अपंग व्यक्ती अधिकार अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
सहायक पोलिस निरीक्षक विशाल एन. बहात्तरे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. त्यांनी तांत्रिक आणि वैद्यकीय पुरावे गोळा करून दोषारोपपत्र बिलोली येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सादर केले. सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अहवाल आणि पीडितेची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. संदीप कुंडलवाडीकर यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे विचारात घेऊन २२ एप्रिल २०२६ रोजी न्यायाधीश बोहरा यांनी आरोपी योगेश कोंडेवाड याला दोषी ठरवले. त्याला खालीलप्रमाणे शिक्षा सुनावण्यात आली: ज्यात २० वर्षे सश्रम कारावास व २७,००० रुपये दंड. दंड न भरल्यास अतिरिक्त ०३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. संदीप कुंडलवाडीकर यांना अॅड. जयेश संदीप अग्रवाल, अॅड. योगेश सतीश पुंड, कर्मचारी पी.आय. इझूलकंटे आणि लिपिक सय्यद गौस यांनी मोलाचे सहकार्य केले. दिव्यांग मुलीला न्याय मिळाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात असून, अशा गुन्ह्यांसाठी ही शिक्षा समाजासाठी एक जरब ठरेल, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.