

Knife attack in Narsi Nanded
नायगाव : नरसी चौकाच्या बाजूला असणाऱ्या परमिट रूम समोर थांबलेल्या २ टोळक्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यातून एकाने दोघांवर चाकू हल्ला केल्याने हे तरुण गंभीर जखमी झाले. यास उपचारात दवाखान्यात दाखल करण्यात आले असून दोघे अटक झाले तरी अन्य आरोपी फरार झाले आहेत.
या घटनेची माहिती सविस्तर अशी की, बळीरामपूर नांदेड येथील काही युवक लग्न कार्याच्या निमित्त रविवारी दि. २५ मे रोजी नरसी येथे आले होते. एका पान टपरी वरून वस्तू खरेदी करीत असताना बाजूला थांबलेले नरसीतील ज्ञानेश्वर भानुदास बट्टेवाड व संतोष गणेश हुलगुलवाड यांच्यासोबत त्यांची बाचाबाची झाली आणि बळीरामपूर येथील एकाने भानुदास बट्टेवाड आणि संतोष हुलगुलवाड यांच्यावर चाकू हल्ला केला.
त्यात दोघांच्याही हाताला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील मारेकरी हे बळीरामपूर नांदेड येथील असून जमावाने या टोळक्यातील दोघांना पकडले तर अन्य साथीदार फरार झाले. ज्ञानेश्वर भानुदास बट्टेवाड (रा. नरसी) यांच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रामतीर्थ पोलिसांनी दिली आहे.
करण ऊर्फ चिलम्या नवघडे हा फरार असून रोहन सुरेश भोळे, अदित्य राजु वाघमारे सर्व राहणार बळीरामपूर नांदेड यांना घटना घडताच उपस्थितांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले आहे. पुढील तपास सोनकांबळे जमादार यांच्याकडे असल्याची माहिती रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सपोनी श्रीधर जगताप यांनी दिली.