Nanded Crime : चिखली जंगलात सागवान तस्करीचा मोठा प्रयत्न उधळला; किनवट वनविभागाची धडक कारवाई, ८ तस्कर पसार!

Nanded Crime : चिखली जंगलात सागवान तस्करीचा मोठा प्रयत्न उधळला; किनवट वनविभागाची धडक कारवाई, ८ तस्कर पसार!
Published on
Updated on

किनवट : किनवट वनपरिक्षेत्रातील चिखली (बु.) नियतक्षेत्रातील झेंडीगुडा जंगलात सागवान लाकडाची अवैध वाहतूक करण्याचा प्रयत्न वनविभागाच्या फिरत्या पथकाने रविवारी (दि. ५) उधळून लावला. वन कर्मचाऱ्यांची चाहूल लागताच आठ संशयितांनी सागवानाचे दहा कट साईज लाकूड आणि गोल नग जंगलात टाकून, मुसळधार पावसाचा फायदा घेत पलायन केले. वनविभागाने घटनास्थळावरून सागवानाचा सर्व मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

वनविभागाचे फिरते पथक चिखली (बु.) अंतर्गत झेंडीगुडा जंगल परिसरात नियमित गस्त घालत असताना डोंगरावरून काही व्यक्ती खाली उतरत असल्याचा आवाज आला. पथकाने तत्काळ त्या दिशेने धाव घेतली असता, चिखली गावातील आठ जण खांद्यावर सागवानाचे ४ नग कट साईज लाकूड (०.१६६४ घनमीटर) व ६ गोल सागी नग (०.१८३ घनमीटर) घेऊन येत असल्याचे निदर्शनास आले. वन कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग सुरू करताच संबंधितांनी लाकूड खाली टाकले आणि पावसाचा तसेच जंगलातील दाट झाडीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

वनविभागाने घटनास्थळावरील सागवानाचा मुद्देमाल जप्त करून तो वनपरिक्षेत्र कार्यालयात आणला. मोजदाद केल्यानंतर कट साईज लाकूड ०.१६६४ घनमीटर तर गोल लाकूड ०.१८३ घनमीटर भरले असून, बाजारभावाप्रमाणे त्याची अंदाजे किंमत ७ हजार ४७२ रुपये असल्याचे सांगण्यात आले. जप्त केलेले लाकूड राजगड डेपोमध्ये जमा करण्यात आले आहे. संबंधित संशयितांची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वन विभागाने दिली.

ही कारवाई नांदेड विभागाच्या उपवनसंरक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवनसंरक्षक किरण चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने, वनपरिमंडळ अधिकारी बी. टी. जाधव, वनरक्षक व्ही. एस. मुळे, बालाजी झम्पलवाड, ओम शिंदे, रवी दांडेगावकर, मंगला दांडेगावकर, वनमजूर राजू रबडे, एल. शिंदे, टी. सिडाम, जंगू सिडाम, तेलंगणा वनविभागातील तीन वनमजूर तसेच वाहनचालक बाळकृष्ण आवळे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news