

नवीन नांदेड : पुढारी वृत्तसेवा नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत अवैध गुटखा वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी कांदा मार्केट चौकात पोलीस कर्मचाऱ्यांसह वाहनांची तपासणी केली असता महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप मध्ये विविध १२ प्रकारचा गुटखा आढळून आला. चालकाला अटक करून सदरील गुटखा जप्त करण्यात आला. या कारवाई मुळे गुटख्याचे तेलंगणा कनेक्शन उघड झाले आहे.
ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात विविध कारवाया सुरू आहेत. त्या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना अवैध धंद्याविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने दिनांक १७ मे रोजी संध्याकाळी ६ वाजेला पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व अंमलदार हे टापरे चौक, नांदेड परीसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप पांढऱ्या रंगाचे वाहन गाडेगांव रोडने बोंढार बायपास हायने नांदेड शहरात जाणार आहे.
त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा सुगंन्धित पान मसाला बेकायदेशीर रित्या विक्री करण्यासाठी घेऊन जात आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने वर नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कांदा मार्केट चौक नांदेड येथे सापळा रचुन महिंद्रा कंपनीची बोलोरो पिकअप क्र. MH-37-T-3601 पांढऱ्या रंगाची थांबवून पाठीमागे जाऊन सदर वाहन चेक करीत असतांना चालकाने पोलीसांना कट मारुन भरधाव वेगात निघून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचा पाठलाग करुन पुढे त्यास आडविले व सदर वाहन चालकास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव रईस मोहम्मद अमेर मोहम्मद, वय 31 वर्ष, व्यवसाय चालक, रा. शांतीनगर जिल्हा अदिलाबाद राज्य तेलंगाणा असे असल्याचे सांगीतले.
सदर पिकअप वाहनाची पाहणी केली असता त्यात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा एकुण किमती वाहनासह 30 लाख 63 हजार 650 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल जप्त करुन सदर आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीचा दोन दिवस पी.सी.आर. दिला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोउपनि व्यंकट कुसमे हे करीत आहेत.
ही कारवाई ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, व्यंकट कुसमे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार मारोती पचलिंग, शंकर माळगे, धम्मपाल कांबळे यांनी केली. सदरची उत्कृष्ट कामगीरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कौतुक करुन, अभिनंदन केले आहे.