

बिलोली : शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून सख्ख्या भावाच्या डोक्यात व छातीवर दगडाने वार करून त्याची हत्या केल्याप्रकरणी आरोपीस बिलोली येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आज शुक्रवारी (दि.३०) हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
देगलूर तालुक्यातील हनुमान हिप्परगा येथे शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या केल्याची घटना २८ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास घडली होती. मृत संजय बसवंत नक्कावार यांच्याकडे वापरण्यासाठी जास्त शेती आली असून त्यातील काही शेती मला दे अशी मागणी आरोपी व्यंकट बसवंत नक्कावार (वय ३२) याने केली होती. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपीने संजय यांच्या डोक्यात व छातीवर दगडाने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मृताची पत्नी गंगामणी संजय नक्कावार यांनी २९ ऑगस्ट २०२३ रोजी देगलूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नऊ साक्षीदारांची साक्षीने सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर. के. मुंडे यांनी पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र बिलोली येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सत्र खटला क्रमांक ७१/२०२३ अन्वये दाखल केले.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर सादर झालेल्या साक्षी व पुराव्यांचा विचार करून तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी व्यंकट बसवंत नक्कावार याला भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.सरकार पक्षाकडून प्रभावी बाजू सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता संदीप भिमराव कुंडलवाडीकर यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजात कनिष्ठ लिपिक भावे रवि, इम्रान शेख तसेच पैरवी कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल शिवराज साखरे (पोलीस ठाणे देगलूर) यांनी सहकार्य केले.