

नरेंद्र येरावार
उमरी: येथून बोळसा (बुद्रुक) गावाकडे भरधाव वेगाने आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणारी ऑटोरिक्षा उलटून एक जण ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.२८) सायंकाळी उमरी तालुक्यातील नागठाणा शिवारात घडली आहे. या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ऑटोचालकाकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मंगळवार हा उमरीचा बाजार दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. बाजार करून काहीजण ऑटोरिक्षात बसून बोळसा गावाकडे निघाले असता नागठाणा शिवारात चालकांचा ताबा सुटल्याने ऑटोरिक्षा उलटली. यात विश्वनाथ गंगाधर चिकटवाड (वय 60 वर्ष, रा. बोळसा) हे ठार झाले, तर लक्ष्मीबाई चिकटवाड, आनंदाबाई ढगे, गंगाधर चिकटवाड, शेषाबाई कोटीवाले, बालाजी राठोड, अंजनाबाई हाळे, अरविंद डोंगरे, रेणुकाबाई चिकटवाड, राम हाळे आदी गंभीर जखमी झाले. या सर्वांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. घटना घडतात प्रथम मयत व जखमींना उमरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉ. नितीन कुर्रे, डॉ.मारोती चंदापुरे, डॉ. अर्जुन शिंदे, आदींनी उपचार केले.
पोलिस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी, जमादार बालाजी जाधव यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. ऑटोचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भरधाव वेगाने व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतुकीचे कसलेही नियम पाळले जात नाहीत. शहराच्या मध्यवर्ती भागातून विशेषता बसस्थानक आणि रेल्वे स्थानक रोडवर सदरील ऑटोरिक्षा थांबवून ओरडून प्रवासी घेऊन वाहतूकीला अडथळा निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत. परंतु याकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही. अनेक रिक्षा चालकाकडे परवाना नाही. तरी देखील मोठ्या प्रमाणात ऑटोरिक्षा चालकाची मनमानी सुरू आहे. याकडे पोलिसांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.