Sahitya Akademi Award : फुलारी यांची अकादमी पुरस्कारासाठी धडक; पण संधी हुकली!

मराठीतील अंतिम 11 पुस्तकांमध्ये नांदेडच्या दोन लेखकांची पुस्तके निवड समितीसमोर गेली
Sahitya Akademi Award
फुलारी यांची अकादमी पुरस्कारासाठी धडक; पण संधी हुकली!pudhari photo
Published on
Updated on

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः बाल वाङ्मयातील ज्येष्ठ लेखक डॉ.सुरेश गोविंदराव सावंत यांनी गतवर्षी या विभागातील साहित्य अकादमी पुरस्कारावर आपले नाव कोरल्यानंतर साहित्यक्षेत्रात त्यांचे स्पर्धक मानले जाणारे नांदेडचेच देवीदास फुलारी यांनीही अकादमीच्या मुख्य पुरस्कारासाठी धडक मारली; पण शेवटच्या फेरीत त्यांची संधी हुकल्याची माहिती समोर आली आहे. मराठीतील अंतिम 11 पुस्तकांमध्ये नांदेडच्या दोन लेखकांची पुस्तके निवड समितीसमोर गेली, हे विशेष!

साहित्य अकादमीने मराठी आणि अन्य 23 भारतीय भाषांतील 2025 सालच्या पुरस्कारांची घोषणा सोमवारी केली. यंदाच्या या पुरस्कारांची घोषणा बऱ्याच विलंबाने झाल्याचे दिसून आले. मराठी भाषेसाठीचा पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील लेखक-चित्रकार राजू बाविस्कर यांच्या ‌‘काळ्यानिळ्या रेषा‌’ या आत्मकथनाला जाहीर झाला. हे पुस्तक पुण्याच्या राजहंस प्रकाशनने 2022मध्ये प्रकाशित केले होते. यानिमित्ताने ‌‘राजहंस‌’च्या पुस्तकास सलग चौथ्या वर्षी अकादमी पुरस्काराचे कोंदण लागले आहे.

Sahitya Akademi Award
Dharur Ghat accident : सिमेंटचा ट्रक दरीत कोसळला

मागील वर्षापासून साहित्य अकादमीने विविध भाषिक पुस्तकांना पुरस्कार देण्यासाठी कार्यपद्धतीत मोठा बदल केला. लेखक-प्रकाशकांना आवाहन करून 2019 ते 2023 या पाच वर्षांच्या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तके थेट मागविण्यात आली. या नव्या पद्धतीमुळे मराठी भाषेतून शेकडो पुस्तके अकादमी कार्यालयाकडे पुरस्कारासाठी दाखल झाली होती. त्यावर पहिल्या दोन टप्प्यांत विहित प्रक्रिया झाल्यानंतर शेवटी 11 पुस्तकांचा 2025च्या पुरस्कारांसाठी विचार केला गेला. त्यामध्ये नांदेडच्या देगलूर तालुक्यातील कादंबरीकार दिवंगत बाबु बिरादार यांची अधिवास ही कादंबरी तर देवीदास फुलारी यांचा ‌‘रात्र भरात आहे‌’ या काव्यसंग्रहाचा समावेश होता.

अकादमीने नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय अंतिम निवड समितीने समोर आलेल्या 11 पुस्तकांतून शेवटी बाविस्कर यांच्या आत्मचरित्राची निवड केली. हे पुस्तक 2022 साली प्रकाशित झाले होते. या पुस्तकाची निवड बहुमताने झाल्याने स्पष्ट करण्यात आले आहे. वरील निवड समितीसमोर कोलाहल (वसंत दत्तात्रेय), काम तमाम ऽ वाघा बॉर्डर (सतीश तांबे), भुरा (शरद बाविस्कर), इन्शाअल्लाह (अभिराम भडकमकर), सिंधूकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास (रवींद्र इंगळे), मनसमझावन (संग्राम गायकवाड), बाऊल (सौमित्र-किशोर कदम) आणि विंदांची कविता शैलीवैज्ञानिक विश्लेषण (रमेश धोंगडे) इत्यादी पुस्तके विचाराधीन होती.

नांदेडमध्ये मागील अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेले सहकार विभागातील निवृत्त अधिकारी श्रीकांत देशमुख यांना 2017 साली ‌‘बोलावे ते आम्ही‌’ या कविता संग्रहासाठी अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर गतवर्षी ज्येष्ठ लेखक सुरेश सावंत यांना बालसाहित्य विभागातील पुरस्कार मिळाला होता. 2025च्या पुरस्कारासाठी दिवंगत बाबु बिरादार यांच्यासह देवीदास फुलारी यांची पुस्तके अंतिम टप्प्यामध्ये आली.

Sahitya Akademi Award
Yashwantrao Chavan Kala Jeevan Gaurav award: यशवंतराव चव्हाण कला जीवनगौरव पुरस्काराने महेश कोठारेंचा सन्मान

बिरादार यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या अधिवास कादंबरीचा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी विचार व्हावा, यासाठी मराठवाड्याबाहेरील एका प्रभावशाली कादंबरीकाराने प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news