Nanded Accident | सहस्रकुंडहून परतणाऱ्या तेलंगणातील भाविकांच्या जीपचा तोटंबा घाटात भीषण अपघातः तिघांचा जागीच मृत्‍यू !

सात गंभीर, तेलंगणातील आपल्या गावी परतणाऱ्या भाविकांच्या कमांडर जीपचा ताबा सुटला
Nanded Accident | सहस्रकुंडहून परतणाऱ्या तेलंगणातील भाविकांच्या जीपचा तोटंबा घाटात भीषण अपघातः तिघांचा जागीच मृत्‍यू !
Published on
Updated on

किनवट : सहस्रकुंड येथील महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणातील आपल्या गावी परतणाऱ्या भाविकांच्या कमांडर जीपचा तोटंबा घाटात सोमवारी (दि. ३१) सायंकाळी सुमारे सहा वाजता भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या जीपचालकाचाही उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी तेलंगणा राज्यातील कुबेर मंडळातील पार्डी येथील भाविक सहस्रकुंड येथील महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून कमांडर जीपने परतीचा प्रवास सुरू असताना तोटंबा गावाजवळील घाटात सायंकाळी सहाच्या सुमारास चालकाचा स्टिअरिंगवरील ताबा सुटून हा अपघात झाल्याची चर्चा आहे.

या अपघातात आवला गंगाधर (५५), तुम साइलू (६०) आणि तुम गौराबाई (६०) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. जीपमध्ये जवळपास १२ भाविक प्रवास करीत असल्याची माहिती असून, उर्वरित सात जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी तेलंगणा राज्यातील कुबेर येथील आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात आले.

अपघातात कमांडर जीपचे चालकही गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक एपी-२५ एएच-६७४७ असा असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच तोटंबा व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींच्या मदतीसाठी तत्परता दाखविली. जखमींना तातडीने उपचारासाठी पाठविण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहण, भोकरच्या अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम तसेच इस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. इस्लापूर पोलिसांनी मदतकार्य करून पुढील कार्यवाही सुरू केली असून, अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news