

नायगाव : नायगाव राज्य महामार्गावर वजिरगाव पाटीजवळ क्रूझर वाहन पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात धुप्पा (ता. नायगाव) येथील तरुण युवक प्रल्हाद रामा भेदेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्दैवी घटना शनिवार (दि. 17 जानेवारी) रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुप्पा (ता. नायगाव) व चिटमोगरा (ता. बिलोली) येथील एकूण अकरा जण नांदेड येथील एक कार्यक्रम आटोपून रात्री सुमारे दहा वाजता क्रुझर (क्र. एमएच २६ ए.के. ०४२९) मधून शंकरनगरकडे निघाले होते. नायगाव तालुक्यातील वजिरगाव पाटीजवळ राज्य महामार्गावर सदर क्रूल्झर वाहनाचा ताबा सुटून ते डिव्हायडरवर आदळले व पलटी झाले.
या भीषण अपघातात प्रल्हाद रामा भेदेकर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी ज्योती प्रल्हाद भेदेकर यांच्या डोक्याला जबर मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच महानंदा यादव कांबळे, अरुणा हनमंत हनमंते, श्याम शंकर सोनकांबळे, शिल्पाबाई रंजीत भेदेकर व नागनाथ भेदेकर हेही जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.अपघाताची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
के टी कन्स्ट्रक्शनच्या निष्काळजीपणामुळे अपघातांचे सत्र
नांदेड–हैदराबाद महामार्गावर के टी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून रस्त्याचे काम झाले असले तरी लेअर न देता काम करण्यात आले आहे, अनेक ठिकाणी आवश्यक लेअर न मारता रस्ता वापरासाठी वापरण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड ते नरसी दरम्यान वारंवार गंभीर अपघात घडत असून अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. संबंधित ठेकेदार व प्रशासनाच्या निष्काळजीपणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी तात्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.