Nanded Home Guard Death: २३ वर्षीय होमगार्डने जीवन संपवले

पोलिस भरतीची करत होता तयारी
Nanded Home Guard Death
Nanded Home Guard Death: २३ वर्षीय होमगार्डने जीवन संपवलेPudhari
Published on
Updated on

किनवट : मांडवी पोलिस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या २३ वर्षीय गणेश मदन चौफाडे याने गोकुंदा येथील नारायणनगर परिसरातील भाड्याच्या खोलीत जीवन संपवल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. गणेश हा सावरगाव तांडा येथील रहिवासी असून, तो पोलिस भरतीची तयारी करत होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गणेश लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या आईने नातेवाइकांच्या मदतीने त्याचे पालनपोषण आणि शिक्षण पूर्ण केले. गणेशची यापूर्वी बीएसएफमध्ये निवड झाली होती. मात्र, काही कारणास्तव त्याने तेथून राजीनामा देऊन परतल्याची माहिती आहे. त्यानंतर तो होमगार्ड म्हणून सेवेत रुजू झाला आणि मांडवी पोलिस ठाण्यात कार्यरत होता.

पोलिस भरतीची तयारी करता यावी, यासाठी गणेश गोकुंदा येथील नारायणनगर परिसरात भाड्याच्या खोलीत सचिन जगदीश पवार आणि भवन संतोष या दोन मित्रांसोबत राहत होता. २ सप्टेंबरच्या रात्री मित्रांसोबत काही वेळ गप्पा मारल्यानंतर सर्वजण झोपले. त्यानंतर पहाटे गणेशने आत्महत्या केल्याचे मित्रांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

माहिती मिळताच किनवट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितेश लेंगुळे आणि पोलिस अंमलदारांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सावरगाव तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणेशने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. किनवट पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, तपासातून आत्महत्येमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news