नायगाव : पतीच्या अपघाती निधनानंतर पत्नीने उचलले टोकाचे पाऊल; मध्यरात्री राहत्या घरी संपवले जीवन

नायगाव : पतीच्या अपघाती निधनानंतर पत्नीने उचलले टोकाचे पाऊल; मध्यरात्री राहत्या घरी संपवले जीवन

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : पतीचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना समजताच पत्नीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि.६) रात्री नायगाव तालुक्यातील बेंद्री येथे घडली. अरुण बाबुराव बेंद्रीकर आणि स्नेहल अरुण बेंद्रीकर असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.

बेंद्री (ता. नायगाव) येथील रहिवाशी अरविंद उर्फ अरुण बाबुराव बेंद्रीकर हे विष्णुपुरी (नांदेड) येथील महावितरण कार्यालयात नोकरीस होते. दिवसभराचे काम आटोपून शनिवारी (दि. ६) रात्री दहा वाजताच्या सुमारास ते दुचाकीने आपल्या गावी बेंद्रीकडे नेहमी प्रमाणे येत होते. दरम्यान, मांजरम गावानजीकच असलेल्या मांजरम कॉर्नर जवळ त्यांच्या दुचाकीला दुसऱ्या एका वाहनाची जोरदार धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अरुण यास अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी नांदेडला नेण्यात आले. परंतु जबर दुखापत असल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी पतीच्या अपघाताचे वृत्त कळताच पत्नी स्नेहल या कुटुंबियांसह पतीला पाहण्यासाठी नांदेडच्या रुग्णालयात आल्या होत्या. तिथे उपचार सुरु असल्याचे सांगत नातेवाईकांनी त्यांना परत बेंद्री येथे घरी पाठवले. मात्र, अपघातात पतीचा मृत्यू झाल्याची कुणकुण स्नेहल यांना लागली. या दुःखातून त्या बाहेर पडू शकल्या नाहीत. या घटनेचा मनावर विपरीत परिणाम झाला अन पतीच्या निधनाचा दुखवियोग सहन न झाल्याने त्यांनी मध्यरात्री घरातील एका खोलीत गळफास घेवून आपली जीवनयात्रा सपंवली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तीन वर्षाची चिमुकली झाली पोरकी

मृत अरुण व स्नेहल यांना तीन वर्षाची एक मुलगी आहे. आई-वडिलांचे छत्र हरवल्याने चिमुकली पोरकी झाली आहे. तसेच आई, वडील, दोन भाऊ असा परिवार त्यांच्या पाठीमागे आहे. रविवारी दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात दोघांच्याही पार्थिवावर बेंद्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news