Nanded Cattle Smuggling : गोवंश तस्करीविरोधात नायगाव पोलिसांची कारवाई; २५ जनावरांची सुटका!

आयशर वाहनातून निर्दयीपणे वाहतूक; वाहनासह २२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
Nanded cattle smuggling
Nanded cattle smugglingpudhari photo
Published on: 
Updated on: 
बाळासाहेब पांडे

नायगाव : नायगाव तालुक्यात गोवंशीय जनावरांची अवैध आणि निर्दयी पद्धतीने वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध नायगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. आयशर वाहनातून २५ गोवंशीय जनावरांची दाटीवाटीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह २५ जनावरे असा एकूण २२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. निलेश राठोड यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध वाहतूक तसेच गोवंशीय जनावरांची क्रूर पद्धतीने वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान १८ नोव्हेंबर रोजी नायगाव पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, नायगाव-नरसी मार्गावर एका वाहनातून गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक केली जात आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मार्गावर सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली. यावेळी एमएच-२० जीसी-७९६१ क्रमांकाच्या आयशर वाहनामध्ये २५ गोवंशीय जनावरे दाटीवाटीने आणि निर्दयीपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ वाहन ताब्यात घेऊन जनावरांची सुटका केली.

या कारवाईत अंदाजे २० लाख रुपये किमतीचे आयशर वाहन आणि अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीची २५ गोवंशीय जनावरे, असा एकूण २२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू आहे.

दरम्यान, गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक, कत्तलीसाठी जनावरांची ने-आण किंवा प्राण्यांवरील क्रूरतेचे प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी अथवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन नायगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.